नाव स्पेशालिटी, पार्किंगचा पत्ता नाही
By admin | Published: January 17, 2015 10:54 PM2015-01-17T22:54:46+5:302015-01-17T22:54:46+5:30
औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये किमान ५० च्यावर खासगी रुग्णालयांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. मात्र यातील बहुतांश इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्थाच
चंद्रपूर : औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये किमान ५० च्यावर खासगी रुग्णालयांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. मात्र यातील बहुतांश इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्थाच नसल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले. एवढेच नाही तर काही रुग्णालयात पार्किंग असतानाही तेथे वाहन लावण्यास मज्जाव करण्यात येत आहे. तर काही रुग्णालयांमध्ये केवळ नावापुरतीच पार्किंग व्यवस्था करून खासगी डॉक्टरांनी मनपा प्रशासन तसेच नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेकली आहे.
शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब आहे. असे असले तरी अनेक इमारतींमध्ये पार्किंग व्यवस्था नाही. यात सुशिक्षीत आणि आर्थिक संपन्नता असलेले काही खासगी डॉक्टरही मागे नाही. रुग्णसेवेच्या नावावर रुग्णांना वेठीस धरायचे आणि आपल्या इमारती जागोजागी उभ्या करायच्या एवढेच डॉक्टरांनी सध्या सुरु केले आहे. पूर्वी चंद्रपूर शहरात नगरपरिषद आणि आता महानगरपालिका अस्तित्वात आली आहे. त्यानुसार प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार पार्किंगची व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र शहरातील काही डॉक्टरांकडे स्वत:चेही वाहन ठेवण्यासाठी जागा नसल्याचे वास्तव आहे.
संभाव्य रुग्णांची गर्दी, बेडची संख्या, त्यांच्या नातेवाईकांच्या वाहनांसाठी जागा आदी सर्व बाजू तपासून पार्किंग व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. मात्र या सर्व बाबींना खासगी डॉक्टरांनी बगल दिली आहे. काही डॉक्टरांनी रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम करण्यासाठी नकाशा मंजूर केला आहे. मात्र मंजुर नकाशाप्रमाणे इमारतीचे बांधकामच करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, इमारतींचे बांधकाम सुरु असताना मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वाट्टेल तसे बांधकाम करून डॉक्टर मंडळी मोकळे झाले आहेत.
यासंदर्भात मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.
परवानगीनुसार बांधकाम नाही
चंद्रपूर शहरात जवळपास ५० च्यावर खासगी रुग्णालयांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. डॉक्टरांनी या इमारतीच्या बांधकामासाठी महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घेतली आहे. यासाठी त्यांनी इमारत बांधकामाचा नकाशाही मंजुर केला आहे. मात्र मंजुर नकाशानुसार बांधकाम न करता मनमर्जीनुसार बांधकाम केले आहे. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांत पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. मनपाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने अनेकवेळा रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र ते डॉक्टरांना जाब विचारण्याच्या मनस्थितीत नसतात. अशावेळी रुग्णालयासमोर मिळेल त्या जागेवर वाहन पार्किग करतात. डॉक्टरांच्या या त्रासामुळे शेजाऱ्यांनी चक्क आपल्या घरांसमोर ‘नो पार्किंग’ असे फलक लावले आहे.