जिल्ह्यातील दुकानांसमोर लावावा लागणार मराठीतून नामफलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 05:00 AM2022-03-26T05:00:00+5:302022-03-26T05:00:35+5:30
कलम ३६ (क) (१) कलम ६ अन्वये नोंदीत प्रत्येक आस्थापनेत १० पेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. परंतु अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरुवातीला लिहिणे अनिवार्य असेल मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार इतर भाषेतील अक्षराच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक दुकान व आस्थापनांचे नामफलक आता मराठीतच ठेवणे अनिवार्य करण्याचा राज्य शासनाचा आदेश शुक्रवारी धडकला. या आदेशानुसार सहायक कामगार आयुक्तांनी यासंदर्भात नियमही जाहीर केले. दुकान व आस्थापना चालकांनी या नियमाचा भंग केल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
राज्यातील दुकान व आस्थापनांचे नामफलक ठेवणे सक्तीचे केल्यानंतर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा झाली. या अधिनियमाच्या कलम ७ अन्वये ज्या आस्थापनेत १० पेक्षा कमी कामगार आहेत. कलम ३६ (क) (१) कलम ६ अन्वये नोंदीत प्रत्येक आस्थापनेत १० पेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. परंतु अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरुवातीला लिहिणे अनिवार्य असेल मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार इतर भाषेतील अक्षराच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही.
अशा आहेत अटी
- प्रत्येक दुकान किंवा आस्थापनेच्या नावाचा फलक मराठीत देवनागरी लिपीत आणि तीही अक्षरे सुरुवातीलाच असली पाहिजे. देवनागरी लिपीतला नावाचा फलक कमी उठावदार असणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे.
‘त्या‘ दोन उल्लेखांना प्रतिबंध
- ज्या आस्थापनेतून मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापना व नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गडकिल्ल्यांची नावे लिहिता येणार नाही. असा बदल शासनाने १७ मार्च २०२२ रोजी या अधिनियमांतर्गत केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालकांनी तरतुदींचे तंतोतंत पालन करावे. नियमाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करू, अशी माहिती आवाहन सहायक कामगार आयुक्त श्रीमती भोईटे यांनी दिली.
सरकारचा निर्णय चांगला आहे. पण सक्ती करू नये, ती ऐच्छिक असावी. इंग्रजी वगळल्यास मराठी व हिंदी देवनागरी लिपीतच लिहिली जाते. नवीन नियमानुसार आता मराठी शब्द उठावदार राहील. आपण महाराष्ट्रात राहत असल्याने मराठीचा सन्मान झालाच पाहिजे. यातून एकतेची भावना वाढेल.
-सदानंद खत्री, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघ, चंद्रपूर