पोलिसांच्या साइटवर जुन्याच अधिकाऱ्यांची नावे; संपर्क क्रमांक चंद्रपूर पोलिस अपडेटच नाहीत!
By परिमल डोहणे | Published: September 9, 2024 12:56 PM2024-09-09T12:56:52+5:302024-09-09T12:57:27+5:30
Chandrapur : महिनाभरापेक्षा अधिकचा कालावधी होऊनही ही साइट अपडेट करण्यास जिल्हा पोलिस प्रशासनाला विसर
परिमल डोहणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे 'सदैव तत्पर, आपल्यासोबत, आपल्यासाठी' हे ब्रिद जोपासणाऱ्या चंद्रपूर जिल्हा पोलिस विभागाची 'चंद्रपूर पोलिस' ही साइट अपडेट करून त्यामध्ये नवनियुक्त अधिकारी व त्यांचे नंबर नोंद करणे क्रमप्राप्त होते. मात्र महिनाभरापेक्षा अधिकचा कालावधी होऊनही ही साइट अपडेट करण्यास जिल्हा पोलिस प्रशासनाला विसर पडला आहे. या साइटवर अद्यापही तत्कालीन पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षकांचीच नावे व नंबर दिसून येत आहेत. त्यामुळे सण-उत्सवाच्या या काळात आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर कुणाशी संपर्क करायचा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
आपत्कालीन स्थितीत संबंधित ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करता यावा, यासाठी जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने 'चंद्रपूर पोलिस' ही साइट तयार करण्यात आली आहे. 'सदैव तत्पर, आपल्यासोबतच, आपल्यासाठी' असे याचे ब्रिद आहे. या साइटवर जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, पोलिस विभागातील सर्व शाखा, सर्व ठाण्यातील ठाणेदार, सहायक पोलिस निरीक्षक यांचे नाव व मोबाइल नंबरची नोंद असते. आपत्कालीन स्थितीत त्या साइटवर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांचा नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क करणे सोपे होते. ५ ऑगस्ट २०२४ ला जिल्ह्यातील १२ पोलिस निरीक्षकांच्या तर २९ ऑगस्ट २०२४ ला चार पीआय, १३ एपीआय व १० पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. एवढे मोठे फेरबदल होऊनची पोलिस साइट अपडेट करण्याचा विसर जिल्हा पोलिस प्रशासनाला पडला आहे. परिणामी सर्वसामान्यांना संपर्क करण्यास अडचण जात आहे.
अनेक ठाण्यांतील लॅण्डलाइन बंद
चंद्रपूर जिल्ह्यात १ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, सात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय तसेच ३४ पोलिस स्टेशन आहेत. मात्र बहुतांश कार्यालयातील लॅण्डलाइन बंद आहेत. त्यातच या पोर्टलवर जुन्याच ठाणेदारांची नावे व नंबर दिली आहेत. त्यामुळे जर आपत्कालीन स्थितीत पोलिस विभागाला मदत मागायची असेल तर कुठे संपर्क करायचा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
या तत्कालिन ठाणेदारांची नावे पोर्टलवर
सायबर पोलिस स्टेशनचे तत्कालिन पोलिस निरीक्षक रोशन यादव, यांची नागपूरला बदली झाली. त्याठिकाणी नवे अधिकारी आले तरीही रोशन यादव यांचेच नाव आहे. रामनगर पोलिस स्टेशनचे तत्कालिन ठाणेदार सुनील गाडे यांची लारपूर व बल्लारपूरचे ठाणेदार आसिफराजा शेख यांची रामनगर ठाण्यात बदली झाली असली तरीही अपडेट केले नाही. पडोली पोलिस स्टेशनचे नागेश चातरकर यांची बढती झाल्याने बदली झाली. योगेश हिवसे त्याठिकाणी रुजू झाले आहेत. यासोबतच डीएसबी, ब्रह्मपुरी, सावली, पाथरी, कोरपना, भिसी, उमरी पोतदार, जिवती, टेकामांडवा, कोठारी आदी ठिकाणी तत्कालिन पोलिस अधिकाऱ्यांचीच नावे व नंबर दिला आहे.