नागभीड, ब्रह्मपुरी तालुक्यात साडेतीन हजार मृतांची नावे मतदार यादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 04:28 PM2024-06-25T16:28:04+5:302024-06-25T16:43:15+5:30

नावे कमी करण्याची प्रक्रिया सुरू : २० ऑगस्टला नवी यादी प्रकाशीत

Names of three and a half thousand deceased in Nagbhid, Brahmapuri taluka in voter list | नागभीड, ब्रह्मपुरी तालुक्यात साडेतीन हजार मृतांची नावे मतदार यादीत

3500 deceased in Nagbhid, Brahmapuri's voter list

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागभीड :
चिमूर विधानसभेत समावेश असलेल्या नागभीड आणि ब्रम्हपुरी तालुक्यात साडेतीन हजार मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत होती. ही नावे कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.


एकदा मतदार यादीत नाव आले आणि तो व्यक्ती मृत झाला तरी, त्या मयत व्यक्तीचे नाव कमी करण्याची तसदी कोणीच घेत नाही. त्यामुळे या मयत व्यक्तींची नावे मतदार यादीत अशीच कायम राहतात. या मयत झालेल्या व्यक्तींच्या नावांमुळे मतदानाच्या टक्केवारीवर ही परिणाम दिसून येत असतो. ही बाब येथील तहसील प्रशासनाच्या लक्षात येताच मागील एप्रिल महिन्यात तहसील प्रशासनाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक घेतली. चिमूर विधानसभेत समावेश असलेल्या नागभीड तालुक्यात ११८ तर ब्रम्हपुरी तालुक्यातील ४१ मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या या बैठकीत केंद्रात कोण व्यक्ती मृत आहे, याची यादी बनविण्यास सांगितले. या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याने त्यांच्या केंद्रातील मृत व्यक्तींची यादी तयार केली आणि ती तहसील प्रशासनाकडे सुपूर्द केली. मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडून आलेल्या माहितीनुसार दोन्ही तालुक्यातील १५९ केंद्रांतून तब्बल साडेतीन हजार मतदार मृत असल्याचे निदर्शनास आले. आता या मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी करण्याची प्रक्रिया तहसील प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. २० ऑगस्ट २०२४ ला जी नवीन मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, त्या यादीत या मृत व्यक्तींची नावे असणार नाही.


निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण व प्रमाणीकरण, नवीन मतदान नोंदणी, नावात दुरुस्ती आदी कार्यक्रमही सुरू आहेत. मतदारांनी आपले नाव यादीत आहे किवा नाही हे तपासून घ्यावे. तसेच नव मतदारांनी आपल्या नावांची मतदार यादीत नोंदणी करावी.
- प्रताप वाघमारे, तहसीलदार नागभीड.

Web Title: Names of three and a half thousand deceased in Nagbhid, Brahmapuri taluka in voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.