नांदा परीक्षा केंद्र कॉपीबहाद्दरांचे विद्यापीठ
By admin | Published: March 6, 2017 12:24 AM2017-03-06T00:24:02+5:302017-03-06T00:24:02+5:30
तालुक्यातील प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा या परीक्षा केंद्रावर भरमसाट कॉपीचा प्रकार सुरु असून परीक्षा केंद्राच्या या ख्यातीमुळे विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ...
खुलेआम चालतात कॉपी : परीक्षा कालावधीत लाखोंची उलाढाल
आशिष देरकर कोरपना
तालुक्यातील प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा या परीक्षा केंद्रावर भरमसाट कॉपीचा प्रकार सुरु असून परीक्षा केंद्राच्या या ख्यातीमुळे विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहे. सध्या बारावीच्या परीक्षेत येथे खुलेआम कॉपी प्रकार सुरु असून संस्थाचालकांकडून लाखो रुपयांची कमाई सुरु आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कॉपी करून हमखास पास होण्याचे विद्यापीठ बनले आहे.
सध्या नागपूर बोर्डाची बारावीची परीक्षा सुरु आहे. शाळेकडून हमखास पासची हमी देण्यात येत असल्याने वाट्टेल तितके पैसे मोजून विद्यार्थी व पालक या शाळेत प्रवेश घेतात. नागपूर बोर्डाच्या दहावी, बारावी व गडचिरोली विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. व बी.एड. या सर्वच परीक्षांमध्ये लाखो रुपयांचा व्यवहार होतो. हमखास पास होण्याची हमी असल्याने या केंद्रावर विविध परीक्षांसाठी चंद्रपूरसह नागपूर, वरोरा, बल्लारपूर, नांदेड, वाशीम, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, माजरी, वणी अशा विदर्भातील अनेक ठिकाणांहून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येतात. विशेष म्हणजे, इंग्रजी या विषयाचे ए.बी.सी.डी. असे चार पेपर सेट असतात. या चारही पेपर सेटचे वेगवेगळे पेपर सोडवून विद्यार्थ्यांना झेरॉक्स वाटण्यात आल्या तर भौतिकशास्त्र या विषयासाठी ६० गुणांची सारखी कॉपी अनेक विद्यार्थ्यांजवळ आढळली. दूरवरून विद्यार्थी येत असल्याने परीक्षाकाळात केंद्रावर १०-१२ चारचाकी वाहने व दोनशेच्या आसपास दुचाकी वाहने असतात. पुढे विज्ञान शाखेचे गणित, रसायनशास्त्र व जीवशास्त्र असे महत्वाचे पेपर असून शिक्षण विभागाने या केंद्राकडे विशेष पथक लावून कारवाई करावी, अशी मागणी जनतेने केली आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावाने
वसूल करतात पैसे
शिक्षणाधिकारी यांना पैसे द्यावे लागतात. त्यामुळे पहिले पैसे गोळा करा म्हणून संथाचालक व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पैसे मागितले जातात. शाळेतील प्रवेशापासून ते गुणपत्रिका नेण्यापर्यंत विद्यार्थ्यांकडून पैसे लुटल्या जातात. यामुळे शिक्षण क्षेत्राला काळिमा फासल्या जात आहे.
हे तर पिढ्या बिघडवण्याचे काम
२५-३० हजार रुपये देऊन वर्षभर शाळेत न येता व कसलेही प्रात्यक्षिक पेपर न देता फक्त पैसे मोजून बोर्डाच्या परीक्षेत पास होत असल्याने शिक्षक-विद्यार्थी आंतरसंबंध निर्माण होत नाही. कसल्याही प्रकारचे प्रात्यक्षिक न देता व अभ्यास न करता पास होत असल्याने सदर शाळेकडे दहावी ते पदवीपर्यंत विद्यार्थ्यांची आवक वाढली आहे. यामुळे मात्र भविष्यातील पिढ्या बिघडवण्याचे काम सुरु आहे.
असा फुटतो पेपर
शाळेतील शिक्षकच अर्धा तास अगोदर पेपरचा मोबाईलमध्ये फोटो काढतात. नंतर रूमवर बसून पेपर सोडवतात किंवा गाईडमधून मोजके ते कापून कोऱ्या कागदावर चिकटवतात व त्याची बारीक झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांमध्ये वाटून देतात. सरसकट तीनशे ते चारशे झेरॉक्स काढून सर्वच विद्यार्थ्यांना वाटण्यात येते. आर्थिक फायदा होत असल्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपासून सारेच या यंत्रणेत सहभागी आहे.
चिरीमिरी घेऊन पथक फुर्रर्र
शिक्षणाधिकारी यांच्याकडून तपासणी व कारवाई करण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या भरारी पथकाला चिरीमिरी देऊन परत पाठविल्या जातात. पथकाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून रक्कम गोळा केली जाते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात कॉपी सुरु असताना पथकाच्या हाती काहीच न लागणे नवलच आहे.
यापेक्षा पहाड बरे !
पहाडावर जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा, भारी, पाटण, टेकामांडवा या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी चालतात, असाच समज आहे. मात्र त्यापेक्षा दुपटीने प्रगत क्षेत्रातील नांदा परीक्षा केंद्रावर चालतात. पण शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी चुप्पी साधून बसले आहे. त्यामुळे शैक्षणिक बाबतीत यापेक्षा पहाड बरे म्हटले तर वावगे ठरणार नाही.