नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासयुगाला प्रारंभ
By admin | Published: September 18, 2016 12:51 AM2016-09-18T00:51:10+5:302016-09-18T00:51:10+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ विकासपुरूष नसून खऱ्या अर्थाने युगपुरूष आहेत.
सुधीर मुनगंटीवार : पंतप्रधानांच्या भाषण संग्रहाचा प्रकाशन सोहळा
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ विकासपुरूष नसून खऱ्या अर्थाने युगपुरूष आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतात खऱ्या अर्थाने विकासाच्या युगाला प्रारंभ झाला आहे. त्यांनी आपल्या कामातून युवा पिढीसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. दिलेल्या शब्दाला योग्य कृतीची जोड देऊन विश्वास निर्माण करत जागतिक स्तरावर भारताचा सन्मान राखणाऱ्या या नेत्याच्या स्फुर्तीदायी भाषणांचा बहुमुल्य ठेवा पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे, याचा आनंद आहे, असे प्रतिपादन वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पुणे येथे प्रकाशित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४२ भाषणांचा संग्रह ‘सबका साथ सबका विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार आदींची उपस्थिती होती. यावेळी पुणेचे उल्हास लाटकर यांनी प्रास्ताविक केले व पुस्तकाविषयीची भूमिका विशद केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचा हा संग्रह त्यांच्याच कार्यपध्दतीला अनुसरून काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष नेत्याच्या हस्ते प्रकाशित होणे हा सुर्वणकांचन योग असल्याचे उल्हास लाटकर यावेळी बोलताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद अजय कौटीकवार व अमित मोडक यांनी केला असून या प्रकाशन समारंभात अजय कौटीकवार यांचा सत्कार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)