नांदेडला आले जत्रेचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:17 PM2018-06-13T23:17:02+5:302018-06-13T23:19:21+5:30
शहरापासून दूर जंगलाजवळ वसलेल्या व जेमतेम तीन हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या नांदेड गावाला बुधवारी जत्रेचे स्वरुप आले होते. या गावातील भूमीपुत्र दादाजी खोब्रागडे यांनी धानावर केलेल्या संशोधनाची कीर्ती देशभर पोहचली आहे.
घनश्याम नवघडे / राजकुमार चुनारकर / संजय अघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : शहरापासून दूर जंगलाजवळ वसलेल्या व जेमतेम तीन हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या नांदेड गावाला बुधवारी जत्रेचे स्वरुप आले होते. या गावातील भूमीपुत्र दादाजी खोब्रागडे यांनी धानावर केलेल्या संशोधनाची कीर्ती देशभर पोहचली आहे. दादाजींच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी खुद्द काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व अनेक बड्या नेत्यांची पावले बुधवारी एचएमटी धानाच्या माळरानावर पडली. आणि त्यांना बघण्यासाठी परिसरातील लोकांचे जत्थेच्या जत्थे नांदेडला एकवटले. त्यामुळे नांदेड गजबजून गेले.
धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भा.रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी नांदेडला येत आहेत, अशी माहिती आ. विजय वडेट्टीवार यांच्यामुळे कळताच नांदेड परिसरात व जिल्ह्यात अचानक उर्जा निर्माण झाली. एका छोट्या गावात देशाचे तीन पंतप्रधानांचा वारसा असलेला एवढा मोठा नेता येत आहे, यावर प्रारंभी कुणाचा विश्वासच बसला नाही. मात्र खात्री झाल्यावर जो-तो नांदेडच्या दिशेने धावू लागला.
बुधवारी अगदी सकाळी ९ वाजेपासूनच नांदेडकडे जाणारे रस्ते माणसांनी व वाहनांनी फुलायला लागले होते. बघता बघता अख्खे नांदेड गाव नागरिकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले. सभास्थळी जाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी करायला सुरूवात केली. राहुल गांधी काय बोलतात, राहुल गांधी कसे दिसतात, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते. यावेळी वातावरणात प्रचंड उकाडा राहुनही लोक हा उकाडा सहन करीत राहुल गांधी येण्याची वाट पाहत होते. यावेळी अनेकांना सभास्थळी जागा न मिळाल्याने लोकांनी घरावर उभे राहून राहुल गांधी यांचे भाषण ऐकणे पसंत केले.
अखेर राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालू लागल्याचे दिसताच लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. लोकांनी टाळ्या वाजवून राहुल गांधी यांचे उत्स्फुर्त स्वागत केले. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सजग झाली. हेलिकॉप्टरमधून उतरताच राहुल गांधी तडक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी दादाजींच्या घरी गेले. श्रद्धांजली अर्पण करून व कुटुंबीयांचे सांत्वन करून ते नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सभास्थळी येताच अगोदर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन केले. राहुल यांचे मंचावर आगमन होताच लोकांनी टाळ्यांचा कडकडाटात स्वागत केले. मंचावर आल्यानंतर मौन पाळून दादाजींना श्रद्धांजली अर्पण केली. आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्याला राहुल गांधींनी सुरूवात केली. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना समजेल, अशा भाषेतच उत्तरे दिल्याने शेतकरीही समाधानी झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
इंदिरा गांधीचा नातू पाहू देन गा
शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या राहुल गांधींना पाहण्यासाठी परिसरातील अबालवृध्दांनी हजेरी लावली होती. मात्र जागा अपुरी असल्याने गर्दीत अनेकांना राहुल गांधींना पाहता आले नाही. तरीही काही वृध्द महिला गर्दीतून मार्ग काढत इंदिरा गांधीचा नातू पाहू देन गा.. असे म्हणत समोरच्यांना विनंती करीत पुढे जाताना दिसत होत्या.
काँग्रेसमध्ये चैतन्य
राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमामुळे नागरिक तर उत्साहात होतेच. यासोबत जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यात निर्माण झालेले हे चैतन्य पुढे काँग्रेसच्या वाटचालीत चांगलेच फायद्याचे ठरणार आहे.
असे आहे नांदेड गाव
शहराच्या वातावरणापासून दूर संवादाचे साधनही नसलेल्या नांदेड गावाची लोकसंख्या जेमतेम तीन हजारांच्या जवळपास आहे. गावात ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य आहेत. गावात जिल्हा परिषदेची वर्ग १ त्ते ७ पर्यत तर ८ ते १२ पर्यत खासगी शाळा आहे. यानंतरचे शिक्षण तळोधी, नागभीड, चंद्रपूर येथे घ्यावे लागते. गावात सर्व समाजाचे वास्तव्य आहे. गावात विशेष बाजारपेठ नाही. दुकानेही फार कमी आहेत. शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे.
घरावर चढून घेतला सभेचा आनंद
राहुल गांधी यांचा जिल्हात प्रथमच शेतकऱ्यांशी चर्चा व आदरांजलीचा कार्यक्रम असल्याने उपस्थितीचा अंदाज प्रशासनाने घेतला नाही. मात्र ज्या ठिकाणी संवाद सभा होती. ती जागा अपुरी पडल्याने नागरिक घरावर चढून तर काहींनी घरावरचे कवेलू काढून डोके बाहेर येईल, अशी व्यवस्था करून सभेचा आनंद घेतला.
चार दिवसांपासूनच रेलचेल
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या दादाजी खोब्रागडे यांनी धानावर अनेक संशोधन केले. त्यामुळे दादाजी अवघ्या देशाला परिचित झाले होते. अशातच खोब्रागडे यांचे ३ जूनला निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रही ढवळून निघाले. त्यामुळे मागील चार दिवसांपासून नांदेड गावात मंत्री, आमदार, खासदार यांच्या या गावात भेटी व रेलचेल सुरू होती.
घरोघरी लागली नास्त्याची दुकाने
गावात देशाचे मोठे नेते येत असल्याने नांदेड गाव हुरळून गेले होते. मंगळवारपासूनच गावात गर्दी उसळू लागली. बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, असा अंदाज बांधून अनेकांनी चहा, चिवडा, पोहे व भजे, पाणी पुरी, आदीची दुकाने लावली होती. एरवी व्यवसाय नसतानाही बुधवारी घराघरासमोर नास्त्याची दुकाने दिसत होती.
वडेट्टीवारांचे दिल्ली कनेक्शन
दादाजी खोब्रागडे यांचे कार्य मोठे होते. त्यांनी आपल्या संशोधनातून शेतकºयांसमोर अनेक मार्ग खुले केले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची महती थेट दिल्लीपर्यंत पोहचविण्याचे काम आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्यामुळेच राष्ट्रीय नेते राहुल गांधी नांदेड या छोट्याशा गावी आले आणि नांदेड पंचक्रोशित प्रसिध्द झाले.