नवरगाव - गिरगाव रस्त्यावरील नाल्याच्या पुलाला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:40 AM2021-02-26T04:40:27+5:302021-02-26T04:40:27+5:30
: दुरुस्तीची नागरिकांची मागणी नवरगाव : नवरगाव - गिरगाव या मुख्य रस्त्यावरील नाल्यावर दहा वर्षांपूर्वी सिमेंट पाईप टाकून सुरळीत ...
: दुरुस्तीची नागरिकांची मागणी
नवरगाव : नवरगाव - गिरगाव या मुख्य रस्त्यावरील नाल्यावर दहा वर्षांपूर्वी सिमेंट पाईप टाकून सुरळीत वाहतुकीसाठी रपटा बनविण्यात आला. मात्र, जड वाहतुकीमुळे रपटा दबला असून, काही ठिकाणी भगदाड पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
सदर रपटा (पूल) हा नागभीड आणि सिन्देवाही तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर आहे. गिरगाव जंगलातील शिवाय मोठ्या दोन तलावातील आणि शेतातील पाणी याच रपट्यावरील लावलेल्या पाईपच्या साहाय्याने पलिकडे जाते. पावसाळ्यात मात्र थोडा जोराचा पाऊस परिसरात झाल्यास या रपट्यावरून पाणी वाहते आणि वाहतूक बंद होते. मोठ्या पुलाची याठिकाणी गरज असताना रपटा बनविण्यात आला आणि हा रपटा जड वाहतुकीमुळे डांबरीकरणासह दबलेला आहे. ज्याठिकाणी सिमेंट पाईप टाकले आहेत, त्यांच्या बाजूची जागा काही भागात अर्धा फूट ते एक फूट दबल्याने शिवाय बाजूला भगदाड पडल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पडलेले भगदाड मुरूम, माती आणि दगडाच्या साहाय्याने बुजविण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही पुन्हा भगदाड पडले.
नवरगाववरून नागपूर, ब्रम्ह्पुरीला जायचे झाल्यास याच मार्गाने जावे लागते. अलिकडे या मार्गावरील वाहतूक वाढलेली आहे. या रपट्यावरील दबलेली जागा वाहनचालकांच्या अगदी जवळ आल्यावरच लक्षात येते. त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन लगेच या रपट्यावरील दुरुस्तीचे काम करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.