नवरगाव आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:02 AM2017-10-27T00:02:36+5:302017-10-27T00:02:48+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र येथे अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र येथे अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे.
सिंदेवाही तालुक्यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी सिंदेवाही येथे ग्रामीण रुग्णालय तर यावरच जास्त भार पडू नये यासाठी प्राथमिक आरोग्य नवरगाव, गुंजेवाही, मोहाळी व प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा असे तालुक्यात चार विभाग करण्यात आले आहे. नवरगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत रत्नापूर, पेंढरी, मिनघरी, खातगाव, पळसगाव (जाट) असे उपकेंद्र जोडले आहेत. मात्र उपकेंद्रामध्ये विशेष सोयी व डॉक्टर नसल्याने त्या-त्या ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जात असतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येणाºया रुग्णांची संख्या दिवेसंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे.
नवरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१ गावांचा समावेश असून ४०-५० हजार लोकसंख्या आहे. इतका भार या केंद्रावर असताना वैद्यकीय अधिकारी दोन पदे मंजूर असून एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. औषधी संयोजकाचे पद रिक्त आहे. परिचराची चार पदे मंजूर असून दोनच कार्यरत आहेत. आरोग्य सेवक पाच पदे मंजूर असताना तीन पदे रिक्त आहेत. आरोग्यसेविका व लिपीक ही पदेही रिक्त असून अशी १३ पदे रिक्त आहेत.
नवरगाव हे तालुक्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत दुसºया क्रमांकाचे गाव आहे. शिवाय या केंद्राजवळ देलनवाडी धुमनखेडा, रत्नापूर, गिरगाव, आलेसूर, नैनपूर, नाचनभट्टी, मिनघरी, उमरवाही अशी विविध गावेही आहेत. एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने कधी सुट्टीवर असल्यास शिवाय वेळोवेळी तालुकास्तरावर जिल्हाभरावर आरोग्य विभागाच्या मिटिंग कार्यक्रम असतात. अशावेळी वैद्यकीय अधिकारी हजर राहू शकत नाही. तेव्हा रुग्ण उपचारासाठी तसेच महिला प्रसुतीसाठी किंवा एखादा रुग्ण इमर्जन्सी असल्यास तारांबळ उळते. अशावेळी दोन वैद्यकीय अधिकाºयांची गरज आहे.
रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथील विविध रिक्त असलेली पदे आरोग्य विभागाने त्वरीत भरावी आणि या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.