आरटीओला खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादीच्या शहर सचिवाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 10:54 AM2021-12-19T10:54:54+5:302021-12-19T11:19:15+5:30
आरटीओ कार्यालयातील एका अधिकाऱ्याला प्रति महिना ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सचिवाला ३५ हजार रुपये स्वीकारताना रामनगर पोलिसांनी रंगेहात पकडले.
चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांना प्रति महिना ५० हजार रुपयाची खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर सचिवाला ३५ हजार रुपये स्वीकारताना रामनगर पोलिसांनी शुक्रवारी रंगेहात अटक केली.
नयन साखरे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. साखरे नेहमीच आरटीओ कार्यालयात जाऊन व्हिडिओ काढयचा. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार करण्याची धमकी द्यायचा.
हा प्रकार टाळण्यासाठी त्याने सहायक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांना प्रति महिना ५० हजार रुपयाची मागणी केली होती. यावेळी ३५ हजार रुपयामध्ये तडजोड करण्यात आली होती. दरम्यान, मेश्राम यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना भेटून तक्रार केली होती. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून आरटीओ कार्यालय परिसरात नयन साखरे याला ३५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक केली.
रामनगर पोलिसांनी साखरेविरुद्ध कलम ३८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश खरसान करीत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला दुचाकी चोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तर शहरातील एकाला आरटीओकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.