जिल्ह्यात अंदाजे सरासरी ७० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 12:50 AM2017-02-17T00:50:35+5:302017-02-17T00:50:35+5:30
जिल्हा परिषदेच्या ५६ व १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांकरिता गुरूवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली.
२३ फेब्रुवारीला निकाल : ८३३ उमेदवारांचे भाग्य इव्हीएममध्ये मशीनबंद
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या ५६ व १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांकरिता गुरूवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळ ५.३० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ७० टक्के मतदान झाले. त्याद्वारे जिल्हा परिषदेच्या ३१५ आणि १५ पंचायत समित्यांच्या ५१८ उमेदवारांचे भाग्य इव्हीएम मशिनमध्ये बंद झाले. एक-दोन अपवाद वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान करण्यात आले. आता २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जाणार आहेत.
जिल्ह्यात दुपारी १२.३० वाजतापर्यंत सरासरी २३ टक्के मतदान, १.३० वाजतापर्यंत ३९.३३ टक्के आणि ३.३० वाजतापर्यंत ५४.७५ टक्के झाले होते. त्यानंतर दुपारी १२.३० वाजेपर्यंत सर्वाधिक २८.५८ टक्के मतदान ब्रह्मपुरी तालुक्यात झाले होते. तर सर्वात कमी चंद्रपूर तालुक्यात १४.११ टक्के होते. दुपारी २.३० वाजतापर्यंत सर्वाधिक ४७.७३ टक्के मतदान पोंभुर्णा तालुक्यात आणि सर्वात कमी २३.७१ टक्के चंद्रपूर तालुक्यात झाले होते. तर दुपारी ३.३० वाजतापर्यंत सर्वाधिक नोंद ६३.७१ टक्के पोंभुर्णा तालुक्यात, त्या खालोखाल ६२.८९ टक्के सावली तालुक्यात आणि सर्वात कमी मतदान चंद्रपूर तालुक्यात ३७.३० टक्के झाले होते. मतदानानंतर पोलिंग पार्ट्या रात्री उशिरापर्यंत तालुका निवडणूक कार्यालयात पोहोचल्या नव्हत्या. दुर्गम भागातील मतदान पथके उशिरा आली. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी मिळू शकलेली नाही. जिल्हा सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी अंदाजे ७० टक्के मतदान झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)