निरोगी जीवनासाठी हवी सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:27 PM2018-04-18T23:27:23+5:302018-04-18T23:28:28+5:30
दुचाकी बाईकवरून सुसाट वेगाने थरार अनुभवणाऱ्या युवा पिढीला सायकल चालविण्यात कमीपणा वाटण्याचे दिवस आता बदलत आहेत. बदलाची ही गती मंद असली तरी तरुणांच्या नव्या कल्पना आणि नवे स्वप्न लक्षात घेऊन वैविध्यपूर्ण सायकली बाजारात उपलब्ध होत असल्याने चंद्रपूर शहरातही रोड बाईक, माऊंटन एमपीबी, हायबर्ड,माऊंटन सायकलींनी विद्यार्थ्यांना भुरळ घातल्याचे दिसून येत आहे.
राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दुचाकी बाईकवरून सुसाट वेगाने थरार अनुभवणाऱ्या युवा पिढीला सायकल चालविण्यात कमीपणा वाटण्याचे दिवस आता बदलत आहेत. बदलाची ही गती मंद असली तरी तरुणांच्या नव्या कल्पना आणि नवे स्वप्न लक्षात घेऊन वैविध्यपूर्ण सायकली बाजारात उपलब्ध होत असल्याने चंद्रपूर शहरातही रोड बाईक, माऊंटन एमपीबी, हायबर्ड,माऊंटन सायकलींनी विद्यार्थ्यांना भुरळ घातल्याचे दिसून येत आहे.
चाकाचा शोध लागल्यानंतर औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. चाकामुळे मानवी जीवनाला गती मिळाली. पायाला चाकाचा आधार मिळताच माणसाचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. आता तर महागड्या दुचाकी व वाहनांचा जमाना आला. नुकतेच पंख फुटलेले विद्यार्थीदेखील बाईकनेच शाळा- महाविद्यालयात जातात. काही श्रीमंत पालकांचा अपवाद वगळ्यास बहुतेक पालकांनी इयत्ता पाच ते दहावीपर्यंतच्या पाल्यांना सायकल घेऊन देतात. ‘बाईक नको, तु सायकलीनेच शाळेत जा’ असा सल्ला देत पाल्यांचा आनंद वाढवितात. सायकल उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली. साध्या सायकलींचे रुपडे पालटले. २५ पेक्षा अधिक सायकलींचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत. चंद्रपूर शहराचा विचार केल्यास काही मोठ्या दुकानांमध्ये रोडबाईक, रेंजर, माऊंटन बाईक अर्थात एमटीबी सायकलची चलती आहे. याशिवाय टुरिंग बाईक्स, फोल्डींग एक्स्ट्रीम, ग्रीअर, सस्पेशन्स असेही प्रकार आढळतात. खाली वाकलेले हॅन्डल, सिल्कबॉडी आणि रांगडा टायर विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतो. जाड टायरमुळे खाचखळग्याच्या रस्त्यावरूहन ही सायकल जोमाने दामटता येते. काही वर्षांपूर्वी स्टिल फ्रेमच्या सायकली चंद्रपुरात येत होत्या. पण बदलत्या आवडीनिवडीनुसार सायकलींचे आकार बदलले. अनेक सायकलींमध्ये आता कॉर्बन फायबर वापरण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. फायब्ररची किमत अधिक असली तरी वजनाने हलके आहे. त्यामुळे तरुणाई ‘हीच सायकल घेऊन द्या’ या शब्दात तगादा पालकांकडे लावतात. मानवी शक्तीद्वारे पायांना गती देऊन चालणारे सायकल वापरणाऱ्यांची संख्या हायस्कूलपर्यंत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाणही चंद्रपुरात लक्षवेधी आहे. एका सरळ रेषेत बसवलेली दोन चाके, लोखंडी पातळ त्रिकोणाकृती चौकट, बैठकीचा तोल गती सांभाळणारी शीट, दोन पायडल त्याला लागणारे ब्रेक यामध्ये कल्पनेच्या पलिकडील बदल घडून आले आहेत. जेवढी वाकडी सायकल तेवढा मोठा आनंद, अशी मानसिकता झाली आहे. अत्याधुनिक व नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन सायकल खरेदी कराव्या लागतात. मोठी आर्थिक गुंतवणूक लागते. डॉक्टरांकडे हजारो रुपये खर्च करणाऱ्यांना सायकलचे महत्त्व कळूनही त्याकडे वळणाºयांची संख्या वाढली पाहिजे. बरेच डॉक्टरर्स स्वत: सायकल वापरतात. पण, रुग्णांना ही उपयोगिता पटवून देत नाही, अशी खंतही एका व्यावसायिकाने व्यक्त केली.
सायकलवरील कर कमी करावा
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. हा खर्च व्हायलाच पाहिजे. पण, सायकलचे महत्त्व कदापि टाळता येत नाही. बाईक व कार वापरणाºयांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, प्रदुषणाचा प्रश्न अतिशय गंभीर झाला. चंद्रपूर शहरातील नागरिक विविध जीवघेण्या आजारांचा सामना करीत आहेत. जिथे-जिथे शक्य आहे, अशा ठिकाणी सायकल वापरल्यास प्रदूषणाची तीव्रता कमी होईल. त्यासाठी सायकल विके्रत्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविले पाहिजे. सायकलींवर १२ टक्के कर लावला जातो. सरकारने हा कर कमी करावी, अशी मागणी सायकल व्यावसायिक विनोद रेगुंडवार यांनी केली.
प्रतिष्ठा महत्त्वाची की आरोग्य?
सायकल वापरल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. आजारांमुळे हैराण झालेल्या रुग्णांना सायकलपासून अनेक लाभ मिळतात. निरोगी जगण्यासाठी सायकलचे महत्त्व समजूनही तथाकथित प्रतिष्ठेमुळे सायकल अडगळीत पडली.
आरोग्यासाठी अडगळीतील सायकली बाहेर काढाव्या
चंद्रपूर शहरातील अनेक कुटुंबींयाकडे एकतरी सायकल हमखास आहे. मात्र या सायकली अडगळीत पडल्या आहे. बहुतेकांनी सायकल सोडून बाईक वापरणे सुरू केले. युवक-युवती दुचाकी बाईक वरुनच महाविद्यालयात जाणाऱ्यांची संख्या वाढली. सायकल म्हटले की, नाक मुरडतात. बदलत्या काळानुसार काही पालकांनी नव्या सायकली विकत घेऊन पाल्यांची मानसिकता घडवित आहेत. पण ही संख्या कमी आहे. ग्रामीण भागामध्ये सायकली नसल्याने अनके विद्यार्थ्यांना कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत पायी शाळेत जावे लागते. त्यामुळे अडगळीत पडलेल्या सायकलींची दुरुरस्ती करुन दुर्गम, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना भेट देण्याची मोहीम सुरू केल्यास त्यांची पाऊले विकासाचे गतीने झेपावतील.
सायकलची कुळकथा
एम. डी. सिव्हर्क या फ्रेंच व्यक्तीने १६९० मध्ये सायकलची संकल्पना जन्मास घातली. त्यासाठी प्रचंड कष्ट उपसून स्वप्न पूर्ण केले. त्याने तयार केलेल्या सायकलीला एका दांड्याने जोडलेली दोन लाकडी चाके होती. दांड्यावर दोन्ही बाजूने पाय सोडून बसावे लागत होते. पायाने जमिनीला रेटा दिल्यानंतर हे सायकल पुढे जात असे. त्यानंतर १८१६ बॅरन कार्ल द ड्रेस सोअरब्रुन यांनी हे वाहन इच्छेप्रमाणे वळविण्यासाठी पुढच्या चाकावर हॅन्डल बसविले. पण, ही सायकल पायाने रेटूनच चालवावी लागत होती. १८४० मध्ये पुढच्या चाकाच्या आसाला पायाने फिरविता येईल, असे क्रॅक (भूजा) बसविण्याची सुधारणा झाली. १८७६ मध्ये एच. जे. लॉसन यांनी पॅडल व साखळी वापरुन मागच्या चालकाला गती देण्याची पद्धत सुरु केली. सायकलच्या जगात १८८७ मध्ये जॉन बॉइड डनलॉप यांनी रबरी टायर सुरू केल्याने क्रांती घडली. त्यानंतरचा इतिहास आज जगासमोर आहे.