संशोधनाभिमुख शिक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:19+5:30
चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर नागपूर व चंद्रपूर जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत चंद्र्रपूर येथील सैनिक शाळेत आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सोमवारी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये संशोधनाला अधिक महत्त्व देणे गरजेचे असून आजचे शिक्षण हे संशोधनाभिमुख होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर नागपूर व चंद्रपूर जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत चंद्र्रपूर येथील सैनिक शाळेत आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सोमवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले तर प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष रेखा कारेकर, सैनिक शाळेचे स्क्रॉडन लिडर प्राचार्य नरेश कुमार, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्रकाश देवतळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (निरंतर) मोहन पवार आदी उपस्थित होते. ना. वडेट्टीवार पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती जोपासावी. समाजाचे व्यापक हित लक्षात घेणारे संशोधन करावे. कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज असून यातून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा. नासामध्ये गेलेले भारतीय आपले संशोधन जगाला दाखवू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना विदेशी संस्थांची मदत घ्यावी लागते. देशपातळीवर आपले पेटंट व्हावी, आपल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली पाहिजे, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले. याशिवाय हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी उपक्रमाची विद्यार्थ्यांनी कशी गरज आहे, याबाबत मार्गदर्शन केले. आभार हु.नो. मस्के यांनी मानले. यावेळी मान्यवर, विद्यार्थी व पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.
विजेत्या विद्यार्थ्याला ५१ हजारांचा पुरस्कार
स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना दिल्ली येथे मॉडेल सादर करण्याची संधी भेटणार आहे. जिल्ह्यात विद्यार्थी यशस्वी झाल्यास ५१ हजारांचा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. सैनिक शाळेच्या आरक्षणात ओबीसी विद्यार्थ्यांनाही प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी दिली. सैनिक विद्यालयातील हे नाविण्यपूर्ण विज्ञान प्रदर्शन २२ जानेवारी २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.
चांदा ते बांदा योजना सुरूच राहणार
चंद्र्रपूर व सिंधुदुर्ग या मागास जिल्ह्यांमध्ये परंपरागत उद्योग व कृषीवर आधारित जोडधंद्यांना चालना देऊन लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी तयार करण्यात आली. ही योजना यापुढेही सुरू राहणार आहे. योजना बंद करण्यात आल्याची अफवा असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नंदोरी येथील पशु प्रदर्शनच्या उद्घाटनानंतर सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. चांदा ते बांदा ही योजना बंद करण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. या योजनेतंर्गत चार वर्षांत जिल्ह्यात २०० दोनशे कोटींची कामे झाल्याचेही त्यांनी सांगितले.