संत गाडगेबाबांच्या विचाराचा आदर्श घेण्याची गरज
By Admin | Published: November 9, 2016 02:08 AM2016-11-09T02:08:30+5:302016-11-09T02:08:30+5:30
८ नोव्हेंबरला ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबईच्या वतीने गाडगेबाबाच्या वाहनास स्मृतीवाहन म्हणून घोषित केले आहे.
रवींद्र मोहिते : स्मृतीरथाचे चंद्रपूर जिल्ह्यात स्वागत
चंद्रपूर : ८ नोव्हेंबरला ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबईच्या वतीने गाडगेबाबाच्या वाहनास स्मृतीवाहन म्हणून घोषित केले आहे. या वाहनाद्वारा स्वच्छता पालखी राज्यभर फिरत आहे. नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यात पालखीे आगमन झाले असून कोरपना तालुक्यातील पारडी गावातून स्वच्छता पालखीची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गाडगेबाबा गावा-गावात जाऊन स्वच्छता, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन या सारख्या गहन विषयावर मार्गदर्शन केले आहे. त्यांचा विचारांचा आदर्श सर्व ग्रामस्थांना घेण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते यांनी केले.
सद्या गाडगेबाबांचे वाहन स्वच्छता पालखी म्हणून राज्यभर भ्रमण करीत असून याद्वारे संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रचार केल्या जात आहे. स्वच्छता पालखी चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यातील पारडी या गावातून झाली. या पालखीचे स्वागत उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, कोरपनाचे गट विकास अधिकारी डॉ. घोंसीकर यांनी केले. त्यानंतर पालखी राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, मूल या तालुक्यातील गावात जाऊन जनजागरण करण्यात आले व स्वच्छता पालखीचा समारोप सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द या गावात करण्यात आला. या ठिकाणावरुन पालखी गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळी यांनी पालखी हस्तांतरीत करण्यात आली.
पालखीचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वगात करण्यात आले. स्वच्छता पालखी चंद्रपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजू आनंदपवार, मूल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दिलीप पांढरवडे, सावली तालुक्याचे गट विकास अधिकारी पंकज भोसले यांनी आपल्या कार्यक्षेत्रात पालखीचे जल्लोषात स्वागत केले.
स्वच्छता पालखीचे जिल्ह्यात कार्यक्रमाची यशस्वी आखणी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशनचे प्रकाश उमक व कृष्णकांत खानझोडे यांनी केली आहे. जिल्ह्यात स्वच्छता पालखीद्वारा जनजागरण करण्यात आले असून यात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते गावागावात पालखीसोबत सहभागी झाले. (प्रतिनिधी)
गाडगेबाबांनी प्राण
त्यागलेले वाहन
१९५० मध्ये संत गाडगेबाबांना महाराष्ट्र शासनाकडून जनजागरण करण्याकरिता वाहन भेट दिले होते. त्याच वाहनाने गाडगेबाबा महाराष्ट्रातील विविध गावात जाऊन भजन किर्तनातून लोकजागरण करण्याचे महान कार्य केले आहे. लोकांचे जनजागरण करतानाच गाडगेबाबांनी प्राण त्यागले आहे. बाबांची प्रेतयात्रा सुद्धा याच वाहनातून निघाली होती. आज गाडगेबाबा नसतील पण त्यांनी वापरलेले वाहन अस्तित्वात असून यावर्षी गाडगेबाबाच्या याच वाहनास महाराष्ट्र सरकारनी स्मृती वाहन म्हणून दर्जा प्राप्त केला आहे.