उच्च शिक्षणाबाबत व्यापक जनजागृतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:21 PM2018-10-02T22:21:58+5:302018-10-02T22:22:29+5:30
केजीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी पीजीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. हे काम महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी करावे. परिसरातील शाळांमध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, असे झाल्यास पदवी व पदव्युत्तर विभागाला कधीच विद्यार्थी कमी पडणार नाही. शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबईचे कुलगुरू प्रा. डॉ. जी. डी. यादव यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केजीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी पीजीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. हे काम महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी करावे. परिसरातील शाळांमध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, असे झाल्यास पदवी व पदव्युत्तर विभागाला कधीच विद्यार्थी कमी पडणार नाही. शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबईचे कुलगुरू प्रा. डॉ. जी. डी. यादव यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान चातगाव येथील सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग यांना गोंडवाना विद्यापीठातर्फे जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ व २५ हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, प्रभारी कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एन. एस. कोकोडे, डॉ. श्रीराम कावळे, प्राचार्य डॉ. राजू मुनघाटे, अयज लोंढे, डॉ. अनिल चिताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची आवर्जुन उपस्थिती होती.
मागासलेपणाला शक्तीस्थळ बनवा -डॉ. बंग
जीवन साधना गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अभय बंग म्हणाले, मागासल्या भागातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचे आव्हान गोंडवाना विद्यापीठाला पेलावे लागणार आहे. हे मागासलेपणच शक्तीस्थळ बनविण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केला पाहिजे. गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती होऊन अवघ्या सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. इतर विद्यापीठे अतिशय जुनी आहेत. या विद्यापीठांची नक्कल करून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास विद्यापीठांच्या रांगेत आपला शेवटचा क्रमांक लागेल. त्यामुळे इतर विद्यापीठांची नक्कल करणे सहजासहजी टाळावे. जंगल, प्रदुषण हे विषय दिल्लीच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिकता येणार नाही. या विषयांवर गोंडवाना विद्यापीठाने भर दिल्यास दिल्लीचे विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठाचा सल्ला घेतील, असे डॉ. अभय बंग म्हणाले.
यांना मिळाला पुरस्कार
उत्कृष्ट रासेयो महाविद्यालय पुरस्कार, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर (विद्यापीठस्तरीय), आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर (जिल्हास्तरीय चंद्रपूर जिल्हा) यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे प्रा. कुलदीप गौंड, आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूरचे प्रा. दिवाकर कुमरे यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार कला, वाणिज्य महाविद्यालय भिसीच्या निकीता प्रल्हाद वरंबे यांना प्रदान करण्यात आला. आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धा पुरस्कार प्रथम क्रमांक नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, उत्तेजनार्थ सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, यांना देण्यात आला. उत्कृष्ट प्राचार्य म्हणून गोंविदराव वारजुरकर कला वाणिज्य महाविद्यालय नागभिडचे प्राचार्य डॉ. संजय आर. सिंग, उत्कृष्ट शिक्षक म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय वाढई, महाविद्यालयातील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निलकंठराव शिंदे, विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावतीचे विशाल गौरकार, अशोक कांबळे यांना गौरविण्यात आले.