ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रदूषणाचा नीरीने सुरू केला अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 11:35 AM2021-12-28T11:35:41+5:302021-12-28T11:50:50+5:30

वन्यप्राण्यांवरील परिणाम मोजण्यासाठी नीरीने ताडोबाच्या जंगलात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यामध्ये ताडोबा परिसरातील हवा, पाण्याची गुणवत्ता, ध्वनी आणि प्रकाशाचे प्रदूषण, जैविक परिणाम असा विविध प्रकारे अभ्यास करण्यात येणार आहे.

Neeri has started a study over impact of mines, power plant on Tadoba Tiger Reserve | ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रदूषणाचा नीरीने सुरू केला अभ्यास

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रदूषणाचा नीरीने सुरू केला अभ्यास

googlenewsNext
ठळक मुद्देवाईल्डलाईफ इंडियाचेही सहकार्य केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केली होती शिफारस

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांवर कोळसा खाणी आणि औष्णिक विद्युत केंद्राचा होणारा परिणाम तपासण्याचे काम नागपूर येथील नीरी संस्थेच्या तज्ज्ञ पथकाने गुरुवार, २३ डिसेंबर २०२१ पासून सुरू केले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आपल्या अहवालात असा अभ्यास करण्याची शिफारस केली होती.

ताडोबा प्रकल्पाजवळ कोळसा खाण सुरू करण्यासाठी वेकोलिला पर्यावरणीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाजवळच महाजेनकोनचा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. हे दोन्ही प्रकल्प ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या दक्षिण सीमेवर आहेत. त्यांचा या प्रदेशातील वन्यजीवांवर होणारा परिणाम तपासण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आपल्या अहवालात केली. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी नागपुरातील नीरी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली.

वन्यप्राण्यांवरील परिणाम मोजण्यासाठी नीरीने ताडोबाच्या जंगलात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यामध्ये ताडोबा परिसरातील हवा, पाण्याची गुणवत्ता, ध्वनी आणि प्रकाशाचे प्रदूषण, जैविक परिणाम असा विविध प्रकारे अभ्यास करण्यात येणार आहे. नीरीला या अभ्यासात वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सहकार्य लाभणार आहे. ताडोबाच्या मध्यापासून सुमारे ३५ किमीच्या क्षेत्रात हा अभ्यास केला जाईल. यामध्ये, कोअर आणि बफर अशा दोन्ही जंगलांचा समावेश राहील. या अभ्यासामुळे खाण आणि जंगल व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची माहिती हाती येऊ शकते.

नीरीच्या अभ्यासाचे स्वरूप

ताडोबा प्रकल्पात जमिनीचा किती वापर होतो. त्याची मोजणी, वाघासह वन्य श्वापदांच्या अस्तित्वाचा अभ्यास,स्थानिक जनतेच्या अवलंबित्वाचे सर्वेक्षण तसेच कोळखा खाणीतून येणाऱ्या ध्वनितरंगांचा अभ्यास, हवेतील घटकांची तपासणी केली जाईल. याशिवाय या प्रकल्पामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या मानव- वन्यजीव संघर्षाचा देखील अभ्यास होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे.

वन्यप्राणी अधिवासाला होणारा धोकाही तपासणार

ताडोबा बफर जंगलात पानांवर धूळ साठण्याचे प्रमाण जास्त आहे. या धुळीचा झाडांच्या प्रकाश संश्लेषणावर काय परिणाम होतो, प्राणवायू व कर्बवायूची पातळी किती, औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे प्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे का, कॉरिडॉर्सचे नुकसान होणार का, याचीही तपासणी नीरीच्या पथकाकडून केली जाणार आहे.

Web Title: Neeri has started a study over impact of mines, power plant on Tadoba Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.