घुग्घुस नगर परिषदनिर्मितीमुळे नीतु चौधरी यांचे सभापतिपद जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:40+5:302021-01-08T05:33:40+5:30
चंद्रपूर : घुग्घुस नगरपालिका निर्मितीची घोषणा झाल्याने घुग्घुस जि.प. गटाच्या सदस्य असलेल्या महिला व बालकल्याण सभापती नीतू चौधरी यांचे ...
चंद्रपूर : घुग्घुस नगरपालिका निर्मितीची घोषणा झाल्याने घुग्घुस जि.प. गटाच्या सदस्य असलेल्या महिला व बालकल्याण सभापती नीतू चौधरी यांचे सदस्यपद गोठणार आहे. त्यामुळे काही महिन्यातच नव्या सभापती विराजमान होणार असल्याने भाजपातील महिला सदस्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाजपकडे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात सध्या एकही महिला सदस्य नाही. नव्या सभापतिपदाची माळ बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील महिला सदस्याच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. या पदासाठी वनिता आसुटकर, वैशाली बुद्धलवार, रोशनी खान यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. जि. प. महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती नीतू चौधरी या घुग्घुस क्षेत्रातून निवडून आल्या. घुग्घुस ग्रामपंचायतीला ३१ डिसेंबर रोजी नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांचे सदस्यपद गोठणार आहे. नीतू चौधरी या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडून आल्या होत्या. आता या पदासाठी या विधानसभेत महिला सदस्य नसल्यामुळे इतर विधानसभा क्षेत्रातील महिला सदस्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्प नियोजनातील इच्छा अपूर्ण
जि. प. चे नवे पदाधिकारी जानेवारी व मार्च महिन्यात पदारूढ झाले. परंतु, घुग्घुस नगरपालिकेच्या निर्मितीमुळे सभापती नीतू चौधरी यांना १० ते ११ महिन्यांचा कालावधी मिळाला. कोरोना प्रादुर्भावामुळे पदाधिकाऱ्यांना जि. प. चा अर्थसंकल्प मांडता आला नाही. शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अर्थसंकल्प मंजूर करण्याचे अधिकार दिले. त्यांनी सन २०२०-२१ या आर्थिक अर्थसंकल्प मंजूर केला होता. काही महिन्यातच दुसरा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. परंतु, चौधरी यांची अर्थसंकल्पाच्या नियोजनात सहभागी होण्याची इच्छा अपूर्ण राहणार आहे.