नागभीडमधील प्राचीन ठेव्यांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:40+5:30
काही गावात या शिलास्तंभांवर हंगामाच्या प्रारंभी बोकडांचा बळी देण्यात येतो. तर काही ठिकाणी या शिलास्तंभांचा गावांच्या सीमेसाठी (शिव) संबोधन करण्यात येत आहे. नागभीड येथेच विठ्ठल मंदिराजवळ असलेले गणपतीचे मंदिर फार पुरातन आहे. हे मंदिर ६०० वर्षांपूर्वीचे आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या मंदिराचे बांधकाम आजही अतिशय भक्कम आहे. येथील शिवटेकडीच्या बाजूला देवतलाव आहे. या तलावात एक झरा आहे.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड व परिसरात ऐतिहासिक ठेव्यांची भरमार असली तरी हे ठेवे जतन करण्यासाठी कोणास काहीही पडले नाही. परिणामी हे ऐतिहासिक ठेवे एक दिवस काळाच्या ओघात गडप होण्याची शक्यता आहे.
नागभीड तालुक्यातील नागभीड, डोंगरगाव, कोरंबी, बनवाही, कसर्ला, मांगली, नवखळा आदी भागात अनेक शिलास्तंभ आहेत. हे शिलास्तंभ लोहयुगीन, महापाषाणयुगीन, बृहदाश्ययुगीन असल्याचे सिद्ध झाले असले तरी स्थानिकांच्या दृष्टीने या शिलास्तंभांना काहीही किंमत नाही. स्थानिक आपल्या सोयीने त्यांना नाव देऊन पूजा वगैरे करीत असतात. काही गावात या शिलास्तंभांवर हंगामाच्या प्रारंभी बोकडांचा बळी देण्यात येतो. तर काही ठिकाणी या शिलास्तंभांचा गावांच्या सीमेसाठी (शिव) संबोधन करण्यात येत आहे. नागभीड येथेच विठ्ठल मंदिराजवळ असलेले गणपतीचे मंदिर फार पुरातन आहे. हे मंदिर ६०० वर्षांपूर्वीचे आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या मंदिराचे बांधकाम आजही अतिशय भक्कम आहे. येथील शिवटेकडीच्या बाजूला देवतलाव आहे. या तलावात एक झरा आहे. या झऱ्यातून सतत पाणी वाहत असल्याने या झऱ्यास गायीचे मुख बसविण्यात आले आहे. शिवटेकडीच्या खाली एक भोसलेकालीन विहीर आहे. अगदी २०, २५ वर्षांपूर्वीपर्यंत लोक या विहिरीच्या पाण्याचा वापर करीत होते. विहिरीतील पाणी काढण्यासाठी पायऱ्या आहेत. आता या विहिरीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही विहीर खचली आहे. काही दिवसांपूर्वीच येथील काही युवकांनी या विहिरीचे जतन करण्याची मागणी केली होती.
या ऐतिहासिक ठिकाणांची पर्यटकांना माहिती मिळावी, यासाठी झेप या निसर्ग संस्थेकडून माहितीचे फलक लावण्याचे विचाराधिन आहे.
- अमोल वानखेडे, उपाध्यक्ष 'झेप'