पुरातन वास्तूच्या देखभालीकडे ब्रह्मपुरी पालिकेचे दुर्लक्ष
By Admin | Published: April 4, 2015 12:29 AM2015-04-04T00:29:58+5:302015-04-04T00:29:58+5:30
ब्रह्मपुरी शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून जरी प्रचलित असले तरी या शहरात ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याकरिता प्राणाची आहुती ...
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून जरी प्रचलित असले तरी या शहरात ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याकरिता प्राणाची आहुती देऊन हौतात्म्य पत्करले ते हुतात्मा गोपाळराव रामचंद्र हर्षे यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारकाची निमिर्त्ती पालिका प्रशासनातर्फे करण्यात आली. मात्र आज या पुरातन हुतात्मा स्मारकाची दुरवस्था झाली असून न.प. प्रशासन मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे.
पालिका प्रशासनातर्फे हुतात्मा स्मारक येथे वाचनक्षक चालविण्यात येते, मात्र येथे अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. स्मारकाच्या छताला छिद्रे पडले असून समोरील भाग तुटलेला आहे. येथील पंखे, लाईट आदी उपकरणे काम करीत नसून वारंवार तक्रार करुनही न.प. प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. तसेच ब्रह्मपुरी नगर परिषदेला जानेवारी २०१५ ला २५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त रौप्य महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. मात्र येथील पुरातन वास्तू हुतात्मा स्मारकवर विद्युत रोषनाईच्या व्यतिरिक्त स्मारक दुरुस्त करण्याचे सौजन्यही न.प. प्रशासनाने दाखविले नाही. दरवर्षीच्या बजेटमध्ये कोटी रुपये विकास कामाच्या नावाखाली खर्च केले जातात. मात्र या वास्तूला रौप्य महोत्सव वर्षी सुद्धा दुरुस्ती करणार की नाही याचीही चिंता व्यक्त केली जात आहे. याच हुतात्मा स्मारक परिसरातत बगीचा असून त्यावर न.प. प्रशासन जपणूक करीत आहे. पण हुतात्मा स्मारक वाचन कक्षात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाकडे खर्च करण्यासाठी रकम शिल्लक रुपये नसल्याचे विद्यार्थ्यांच्या वारंवार पुस्तक मागणीवरुन दिसून येत आहे. न.प. प्रशासनाने आवश्यक त्याच बाबीवर खर्च करुन शहराचा सर्वांगीण विकास करावा अशी मागणी नागरिकांची आहेत. (तालुका प्रतिनिधी)
रमाबाई आंबेडकर चौकातील वाचनकक्षाची दुरवस्था
न.प. प्रशासनातर्फे रमाबाई आंबेडकर चौक येथे दोन लाख रूपये खर्च करुन वाचनकक्ष बांधण्यात आले. मात्र याच वाचन कक्षात बोरी, काट्या तसेच अनेक झाडे वाढत असूून वाचनकक्ष दुर्लक्षीत आहे.