प्लास्टिक पिशव्यांच्या वापराकडे मनपाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:17 PM2019-07-16T23:17:13+5:302019-07-16T23:17:34+5:30
राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर संबंधित प्रशासनासह महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही दिवस कारवाईचा देखावा केला. आता मात्र शहरात सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. याकडे महापौरांसह, पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर संबंधित प्रशासनासह महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही दिवस कारवाईचा देखावा केला. आता मात्र शहरात सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. याकडे महापौरांसह, पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. युझ अॅण्ड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याने सर्वत्र खच पडला आहे.
बाजारात ग्राहक सर्रास प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात. प्लास्टिकचा कचरा वाढू लागल्याने शासनाने त्यावर बंदी आणली. परंतु त्यानंतरही शासकीय यंत्रणेकडून अंमलबजावणी होत नसल्याने प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आले नाही. वजनाने हलक्या असल्याने प्लास्टिक पिशव्या हवेबरोबर वाहत जावून पाणीसाठे, जंगल आणि जमिनीवर साचतात.
मोकाट जनावरे, जलचर प्राणी अन्न समजून या प्लास्टिक पिशव्या गिळतात. आतड्यात प्लास्टिक साचल्याने त्यांचा मृत्यू होतो. पावसाळ्यात प्लास्टिक पिशव्यामुळे गटारे कोंबून पाणी साचते. डबके निर्माण झाल्याने डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होते. एवढेच नाही तर प्लास्टिकमधील पॉलीमर्स जमीन, पाणी व अन्नसाखळी दुषित करतात. ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक बाब आहे. त्यासाठी प्लास्टिक पिशव्यांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्लास्टिकच्या अतिवापराने आज विविध समस्या निर्माण झाल्या आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात वन्य प्राणी आहेत. हे प्राणी प्लास्टिकच्या विळख्यात सापडण्याची भिती आहे. वन्यप्राण्यांनी प्लास्टिक भक्षण केले तर त्यांनाही धोका होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीने ठरविले तर प्लास्टिकपासून मुक्ती मिळू शकते.
शासनाने राज्यात प्लास्टिक बंदी केली. ३५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना ही बंदी आहे. मात्र सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. या बंदीची ज्यांच्यावर जबाबदारी शासनाने सोपविली, त्यांनी काही दिवस देखावा केला. आता मात्र सदर कारवाई थंडावली आहे. जिल्ह्यासह शहरात राजरोसपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. यासोबतच कायद्याची अंमलबजावणी होणेही महत्त्वाचे आहे. मात्र यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाºयांची मानसिकता आवश्यक आहे. केवळ देखावा करून चालणार नाही, तर ठोक कारवाई करून कायमस्वरुपी बंदी घालणे महत्त्वाचे आहे.