पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:29 AM2021-05-26T04:29:19+5:302021-05-26T04:29:19+5:30
वळण मार्गावर अपघाताची शक्यता चंद्रपूर: शहरातील काही घरांचे बांधकाम नगर रचना विभागाने मंजूर केलेल्या नकाशानुसार नसल्यामुळे वळण मार्गावर अनेकवेळा ...
वळण मार्गावर अपघाताची शक्यता
चंद्रपूर: शहरातील काही घरांचे बांधकाम नगर रचना विभागाने मंजूर केलेल्या नकाशानुसार नसल्यामुळे वळण मार्गावर अनेकवेळा अपघात होत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. मंजूर नकाशानुसार बांधकाम नसेल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
शिकवणी वर्गांनाही फटका
चंद्रपूर : लॉकडाऊननंतर सर्वच बंद झाल्याने खासगी शिकवणी वर्गावरही निर्बंध आले. परिणामी, शिकवणी वर्ग संचालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकवणीपासून मुकावे लागले आहे.
झाडांच्या फांद्यांनी झाकोळले पथदिवे
चंद्रपूर : शहरातील काही पथदिव्यांसमोर झाडांच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. काही दिवसापूर्वी महापालिकेने स्वच्छता मोहीम आरंभली. मात्र आजही अनेक रस्त्यावर फांद्या असून अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाण्याच्या टाक्या ठरल्या शोभेच्या वास्तू
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावात नळ योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावात नळ योजनेचे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
अल्पवयीनांच्या हाती वाहनांच्या चाव्या
चंद्रपूर: मागील काही दिवसापासून लाॅकडाऊन सुरू आहे. असे असले तरी अल्पवयीन मुले मोटरसायकलवर स्वार होऊन सुसाट वेगाने गाड्या चालवीत आहेत. त्यांच्याजवळ गाडी चालविण्याचा परवानाही नसतो. पोलीस प्रशासनाने अल्पवयीन वाहनचालकांवर नजर ठेवून त्यांना आवर घालावा, अशी मागणी केली जात आहे.
सिग्नल सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील वरोरा नाका चौकामध्ये अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी नव्याने उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या चौकाला विशेष महत्त्व आले आहे. मात्र येथून भरधाव वेगाने वाहन नेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रशासनाने येथे सिग्नल सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.
बाजारातील गर्दीवर नियंत्रण आणावे
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. असे असतानाही काही दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. येथील गोलबाजारामध्येही मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
वेतन वाढविण्याची मागणी
चंद्रपूर : कचरा संकलित करणाऱ्यांना अत्यल्प वेतन दिले जात असल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालनपोषण करताना मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागतो. लॉकडाऊनच्या काळामध्येही त्यांनी आपले कार्य चोखपणे बजावले आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलकांचे वेतन वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
तरुणांना जीम सुरू होण्याची प्रतीक्षा
चंद्रपूर : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात जीम संचालकांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यामध्ये ट्रेनरचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर व्यवहारांप्रमाणे जीम केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्याचे काम गतीने करावे
चंद्रपूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम गतीने करण्याची मागणी केली जात आहे.
कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या
चंद्रपूर : कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिकारशक्ती वाढवा, हंगामातील ताजी फळे खाणे किंवा त्यांचा रस प्या, पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करा, जेवणातील सर्व पदार्थ ताजे व गरम खा, जेवणाच्या वेळांचे पालन करा, पालेभाज्या, कडधान्यांचा अधिक वापर करा, असा सल्ला जिल्हा आरोग्य विभागाने दिला आहे.
नागरिकांनी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये
चंद्रपूर : कोरोनामुळे सर्वत्र दहशत पसरली. राज्य शासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सामाजिक जबाबदारी म्हणून सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले.
डासांचा प्रकोप वाढल्याने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील बहुतांश वाॅर्डात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागात आरोग्य जागृतीला वेग आला आहे. परंतु नाली स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.