सुरक्षा फलकांचा निव्वळ देखावाच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:07 PM2018-06-05T22:07:04+5:302018-06-05T22:07:17+5:30
वेकोलि कोळसा खाणीत पर्यावरण संतुलन व धुळ प्रदूषणावर आळा घालण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. मात्र खाणीतील पर्यावरणाची स्थिती बघता निव्वळ देखावा म्हणून पर्यावरण संतुलन व खननविषयी खाण परिसरात पर्यावरणाचे नियम सांगणारे फलक लावण्यात आले आहे.
प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : वेकोलि कोळसा खाणीत पर्यावरण संतुलन व धुळ प्रदूषणावर आळा घालण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. मात्र खाणीतील पर्यावरणाची स्थिती बघता निव्वळ देखावा म्हणून पर्यावरण संतुलन व खननविषयी खाण परिसरात पर्यावरणाचे नियम सांगणारे फलक लावण्यात आले आहे.
राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोवरी वेकोलिमध्ये मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. गोवरी, सास्ती, पोवनी व साखरी परिसरामध्ये धुळीचे प्रदूषण वाढल्याने नागरिक हैराण झालेत. वेकोलित पर्यावरण संतुलनाचे मोठमोठे फलक लावून वेकोलिच्या कोळसा खाणीत पर्यावरण सुरक्षित असल्याचा आव आणला जातो. जागतिक पर्यावरणदिनी कोळसा खाणीत पर्यावरणाच्या सुरक्षेसंबंधी वेकोलि प्रशासनाने गाजावाजा करून लाखो रूपयांची उधळपट्टी केली जात आहे. पण, वर्षभरातील पर्यावरण सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी विचारला आहे.
वेकोलि कोळसा खाणीत दरवर्षी सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. यात पर्यावरणाच्या सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे समजावून त्याचे तंतोतंत पालन करण्याचे सागिंतले जाते. कामगारांच्या सुरक्षेसंबंधी नियमांचे पालन करण्याची शपथही दिली जाते. पण, हा निव्वळ देखावा असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पर्यावरणाची सुरक्षा जोपासण्यासाठी वेकोलिला वर्षाकाठी लाखो रूपयांचा खर्च करावा लागतो. मात्र प्रत्यक्षात वेकोलिच्या कोळसा खाण परिसरातील परिस्थिती वेगळीच आहे कोळसा खाणीत पर्यावरण संतुलनाचे कोणतेच नियम पाळले जात नाही.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेकोलिला अनेकदा नोटीस दिली. या नोटीसांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पर्यावरण संतुलन राखण्याचे सर्व नियम पाळले जात नाही. पर्यावरणाच्या नियमांना तिलांजली देत वेकोलिने मागील अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या कोळशाचे उत्पादन सुरू ठेवले आहे.
कोळसा खाणीतील पर्यावरण संतुलन बिघडल्याने वेकोलि परिसरातील शेतीच दरवर्षीे मोठे नुकसान होते. मागील वर्षी या परिसरातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन लागवड केली होती. अल्प पाऊस व वाढत्या प्रदुषणाचाही अनिष्ट परिणाम पिकांवर झाला.
यावर आळा घालणारी व वेकोलिला पर्यावरणाचा नियम सांगून धडा शिकविणारी सक्षम व कर्तव्यदक्ष यंत्रणा वेकोलिने अद्याप तयार केली नाही. त्यामुळे वेकोलिचे कोळसा उत्पादन पर्यावरणाच्या मुळावर उठले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गप्रेमी व पर्यावरण सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला जाणार आहे. यामध्ये सामाजिक संघटनांचाही पुढाकार असतो. परंतु, पर्यावरणाचे सर्रास उल्लंघन करून करणाºया वेकोलिने केवळ फलक लावल्याचे परिसरात दिसून येत आहे.
जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण बचाव संदेश
५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. निसर्गप्रेमी व पर्यावरणाची सुरक्षितता जोपासणाऱ्या सामााजिक संघटनांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पर्यावरणाचा झपाट्याने होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी ‘पर्यावरण बचाव’ चा संदेश दिला जातो. यासाठी सामाजिक संघटनांचा खुप मोलाचा वाटा आहे. पर्यावरणाचे जतन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी वेकोलिने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून झटले पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
वेकोलिमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. वातावरण सर्वत्र दूषित झाल्याने नागरिकांसह सजीव सृष्टीवर विघातक परिणाम झाला. त्यामुळे वेकोलिने पर्यावरण जोपासण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
- रिंकु मरस्कोल्हे
निसर्गप्रेमी मित्रमंडळ, राजुरा