स्वातंत्र्य लढ्यात नेताजींचे योगदान महत्त्वपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:39 PM2019-01-27T22:39:26+5:302019-01-27T22:40:03+5:30
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोरविरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेऊन भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोरविरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेऊन भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. नेताजींचे स्वातंत्र्यलढयातील कार्य म्हत्वपूर्ण असून आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारे, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उठवायला लावणारे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेताजी चौक, बाबुपेठ येथील पुतळ्याचे नूतनीकरण व सौदर्यीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आंदोलनाची इंग्रजांनी धास्ती घेतली होती. नेताजींचे एकूण जीवनच देशभक्त क्रांतिकारकाचे व रोमांचकारी आहे. परदेशात जाऊन इतर मित्रराष्ट्रांच्या साह्याने त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. हे त्यांच्या धडाडीचे, संघटना कौशल्याचे, समयसूचकतेचे व मुत्सद्देगिरीचे निदर्शक आहे. त्यांचा स्वभाव दृढनिश्चयी व प्रसंगी कठोरही होता; तथापि त्यांचे वागणे मात्र सौजन्यशील व सौहार्देचे असे. मूळात त्यांचा कल आध्यात्मिक साधनेकडे होता. दूरदृष्टी, आत्मविश्वास, धडाडी आणि निर्भयता यांमुळे कोणत्याही प्रसंगी ते डगमगले नाहीत. आजच्या युवकांनी नेताजींचा आदर्श बाळगणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.