सायगाटाच्या शिवारात नेदरलँडचे पाहुणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 10:20 PM2018-04-15T22:20:29+5:302018-04-15T22:20:29+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे सायगाटा येथील प्रगत शेतकरी शिवदास कोरे यांच्या शेतीला नेदरलँड येथील विदेशी पाहुण्यांनी भेट देऊन चटणी-भाकरीचा आस्वाद घेतला. शिवाय, कोरे यांच्या शेतीचे प्रयोग आणि भारतीय कृषी संस्कृतीची माहितीही जाणून घेतली.
रवी रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे सायगाटा येथील प्रगत शेतकरी शिवदास कोरे यांच्या शेतीला नेदरलँड येथील विदेशी पाहुण्यांनी भेट देऊन चटणी-भाकरीचा आस्वाद घेतला. शिवाय, कोरे यांच्या शेतीचे प्रयोग आणि भारतीय कृषी संस्कृतीची माहितीही जाणून घेतली.
राज्य शासनाचा कृषिभूषण पुरस्कारप्राप्त सायगाटा येथील शेतकरी शिवदास कोर यांनी शेतीमध्ये विविध नाविण्यपूर्ण प्रयोग करतात. त्यामुळे शेतीला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेचे डॉ. सतीश गोगुलवार यांच्या माध्यमातून कोरे यांच्या शेतीची माहिती मिळाल्याने नेदरलँड येथील त्रियूली टोमारिलो, विटा टोमारिलो या दाम्पत्यांनी कन्या दिलनवाज वारीवा हिला सोबत घेऊन टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कोरे यांच्या शेतीला नुकतीच भेट दिली. सेंद्रीय खताच्या माध्यमातून कोरे यांनी विविध पिकांचे उत्पादन घेत आहेत. टोमारिलो यांची कन्या दिलनवाज ही मुंबई येथे वास्तव्याला आहे.
तिनेच संवादकाची भूमिका पार पाडली. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या का करतात याची कारणेही कोरे यांच्याकडून जाणून घेतली. पिण्याचे पाणी, स्वयंपाकाचे साहित्य, शेतीची विविध उपकरणे याविषयीही विदेशी पाहुण्यांनी माहिती टिपून घेतली. पाटे, सुप, वरवंटा, पाटी आदी जीवनापयोगी वस्तुंना त्यांनी कॅमेराबद्ध केले. शेतावरच्या बांद्यावरच कोरे यांचे कुटुंब वास्तव्याला राहत असल्याने त्रियूली टोमोरिलो विटा टोमोरिलो आणि कन्या दिलनवाज यांनी कोरे कुटुंबीयांसोबत चटणी भाकरीचा आस्वाद घेतला.