नव्या जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 11:16 PM2022-10-29T23:16:19+5:302022-10-29T23:16:48+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या बदलीमुळे त्यांच्या जागी मुंबई राज्य गुप्तचर विभागातील उप आयुक्त रवींद्रसिंग परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे. गुप्तचर विभागातील त्यांच्या अनुभवाने ते शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे
परिमल डोहणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरची ओळख शांतताप्रिय जिल्हा म्हणून आहे. विविध जाती-धर्मांचे, विविध राजकीय पक्षांचे दिग्गज पुढारी या जिल्ह्यात वास्तव्यास असले तरीही जिल्ह्यात कोणतीही जातीय किंवा राजकीय दंगल झाली नाही. असे असले तरीही मागील काही वर्षांत मात्र येथील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मर्डर, चोरी, छेडछाड, अत्याचाराच्या घटना या नित्याच्याच झाल्या आहेत. यावर आळा घालण्याचे आव्हान नवे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्यापुढे उभे ठाकले आहे. ही आव्हाने ते कशी पेलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सन २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. अन् तेव्हापासून गुन्हेगारीला नवे स्वरूप आले. पैसे कमविण्याच्या नादात अनेक युवा तरुण अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात गुंतले अन् यातूनच संघटित गुन्हेगारीला सुरुवात झाली. भर चौकात दारू विक्रीच्या वादातून अनेक हत्या झाल्या.
ड्रग्ज, गांजाचीही सर्रास विक्री होऊ लागली. आता दारूबंदी उठली असली तरीही जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीही सुरूच आहे. तर अनेक दारूविक्रेते घरफोडी, चोरी, दुचाकी चोरी करीत असल्याचे काही कारवायांतून पुढे आले आहे. त्यामुळे शांततापूर्ण असलेल्या जिल्ह्याचे वातावरण गुन्हेगारीने ढवळून निघत आहे.
यावर अंकुश लावण्याचे आव्हान नुकताच पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेल्या रवींद्रसिंग परदेशी यांच्यापुढे आता उभे ठाकले आहे.
दरोडे अन् चोऱ्या वाढल्या
- मागील तीन ते चार वर्षांपूर्वी शहरात छोट्या-मोठ्या चोऱ्या, घरफोडीची नोंद असली तरी मागील दोन वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यातील धाडसी दरोडा पडल्याचेही समोर आले आहे. वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र तर चक्क चारवेळा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर पाचव्या वेळी संपूर्ण रोकड पळविण्यात आली.
- वरोरा बँक ऑफ इंडिया येथून दिवसाढवळ्या १६ लाख रुपयांची रक्कम पळविण्यात आली होती. भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील कोकण बँकेतही दरोडा पडला. घोडपेठ येथील एक बँक फोडण्याचा प्रयत्न केला होता. यासोबतच चंद्रपुरातील एका व्यापाऱ्याच्या घरून बेडखाली ठेवलेली पैशाची बॅगच दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून पळविली. तर दुसऱ्या एका व्यापाऱ्याचे पैसे बँकेत भरण्यासाठी गेल्यानंतर पळविले होते.
नव्या पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या बदलीमुळे त्यांच्या जागी मुंबई राज्य गुप्तचर विभागातील उप आयुक्त रवींद्रसिंग परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे. गुप्तचर विभागातील त्यांच्या अनुभवाने ते शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे
अत्याचार व विनयभंगाची आकडेवारी चक्रावणारी
- मागील काही वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात मुली व महिलांची छेडछाड, विनयभंग व अत्याचारांची आकडेवारीही वाढली आहे.
- पोलीस विभागाकडून शाळा - महाविद्यालयांत याबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी अत्याचार व विनयभंगाची आकडेवारी चक्रावणारी आहे