गुन्हेगारीतही नवीन चेहरे, पोलिसांची वाढली डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:31+5:302021-06-19T04:19:31+5:30
चंद्रपूर : चित्रपटसृष्टीतील कथानकाचे अनुकरण, वाढती बेरोजगारी, झटपट पैसा कमविण्याच्या नादात आजचे युवक भरकटून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहेत. जिल्ह्यात ...
चंद्रपूर : चित्रपटसृष्टीतील कथानकाचे अनुकरण, वाढती बेरोजगारी, झटपट पैसा कमविण्याच्या नादात आजचे युवक भरकटून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहेत. जिल्ह्यात मागील अडीच वर्षांत घडलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यामध्ये २० ते ४० वयोगटातील नवीन चेहरे गुन्हेगारी जगतात आरोपी म्हणून समोर आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढ होत असून पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. जिल्ह्यातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शासनाने सन २०१५ पासून जिल्ह्यात दारूबंदी केली. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीला सुरुवात झाली. झटपट पैसा कमविण्याच्या नादात अनेकांची या व्यवसायात उडी घेतली. अनेक शाळकरी विद्यार्थीसुद्धा अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यात अडकले. त्यातच या व्यवसायात एकमेकांमध्ये स्पर्धा झाल्याने अनेकांचे मुडदे पाडल्याचाही घटना समोर आल्या आहेत. यासोबतच चेनस्नॅचिंग, घरफोड्या, लूटमार, दुचाकी व मोबाईल चोरी या प्रकरणातील आरोपीसुद्धा बहुतांश २० ते ४० वयोगटातील असल्याचे समोर येत आहे. पोलीस रेकॉर्डवर आलेल्या या मुलांचे भविष्य धोक्यात आले असल्याने पालकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. तर कोरोना काळात गुन्हेगारी जगतातील नव्याने आलेले चेहरे पोलिसांची डोकेदुखी बनत असल्याने त्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
------
जिल्हा कारागृहात हत्येचे ११५ तर बलात्काराचे ९० आरोपी
चंद्रपूर जिल्हा कारागृहात ४१४ बंदिवान आहेत. यामध्ये ११५ हत्येचे आरोपी आहेत. यात चार महिलांचा समावेश आहे, तर ९० आरोपी हे बलात्कार प्रकरणातील आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश आरोपी २० ते ३० वयोगटातील आहेत.
बॉक्स
खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार
घटनेचा तपास करताना पोलिसांना खबऱ्यांची बरीच मदत मिळत असते. कोरोनाकाळात पोलिसांवर तणाव वाढला आहे. तसेच जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण बघता पोलिसांना खबऱ्याची संख्या वाढविण्याची गरज आहे.