नवीन उद्योगांवरील बंदी हटविली

By admin | Published: May 30, 2016 01:09 AM2016-05-30T01:09:13+5:302016-05-30T01:09:13+5:30

जिल्ह्यातील एमआयडीसी ताडाळी, घुग्घुस व बल्लारपूर येथे वाढत्या प्रदूषणामुळे १३ जानेवारी २०१० ला नवीन उद्योग स्थापन करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

New industry ban was deleted | नवीन उद्योगांवरील बंदी हटविली

नवीन उद्योगांवरील बंदी हटविली

Next

रोजगार उपलब्ध होणार : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय
चंद्रपूर : जिल्ह्यातील एमआयडीसी ताडाळी, घुग्घुस व बल्लारपूर येथे वाढत्या प्रदूषणामुळे १३ जानेवारी २०१० ला नवीन उद्योग स्थापन करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ही बंदी नुकतीच हटविली असून उद्योग स्थापन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या या निर्णयाने ताडाळी, घुग्घुस, बल्लारपूर येथील एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग स्थापन होऊन शेकडो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
देशात पर्यावरण मंत्रालयाद्वारे १३ जानेवारी २०१० पासून ४३ कॉम्प्रेहेन्सीव्ह इर्न्वामेंटल पोल्युशन इंडेक्स (सीपी) असलेल्या ठिकाणी अती प्रदूषणामुळे उद्योगावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी महाराष्ट्रात चंद्रपूर येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये पाहणी करून सीपीची स्थिती जाणून घेतली व १८ एप्रिल २०१६ ला मंत्रालयाला अहवाल सादर केला. या अहवालात चंद्रपूर येथील सद्यस्थितीत सीपीचा गणक हा ५४.४२ असल्याचे म्हटले आहे. यापुर्वी म्हणजे २०१३ ला सीपीसीबी यांनी केलेल्या पाहणीत सीपीचा गणक हा ८१.९० होता. त्यामुळे सद्य:स्थितीतील ५४.४२ गणकाच्या आधारे उद्योगांवरील बंदी उठविण्यात आली आहे.
बंदी हटविण्यासाठी राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, चंद्रपूरचे आ. नाना श्यामकुळे व एमआयडीसी असोसिएशन तसेच बंद उद्योगातील प्रमुखांची संयुक्त बैठक झाली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली होती.
बंदी हटविण्याच्या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर एमआयडीसी, ताडाळी, घुग्घुस व बल्लारपूर येथे अधिस्थगनामुळे बंद पडलेले उद्योग पूर्ववत सुरू होण्यास मदत झाली आहे. तसेच या क्षेत्रात गत पाच ते सहा वर्षापासून नवीन उद्योग विस्तार व गुंतवणूक थांबलेली होती, ती सुद्धा सुरू होणार असून या माध्यमातून नवीन रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

हंसराज अहीर यांचा पाठपुरावा
ताडाली, बल्लारपूर, घुग्घुस येथील एमआयडीसीतील उद्योगांवर घालण्यात आलेली बंदी हटविण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सतत पाठपुरवा केला. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथील उद्योगांवरील बंदी रद्द केली. चंद्रपुरात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी खा. अहीर यांनी महाऔष्णिक विद्युत केंद्रातील १ व २ क्रमांकाचे संच बंद करवून घेतले. हे दोन संच प्रामुख्याने जास्त प्रदूषण करीत होते. त्यामुळेच २०१३ ला ८१.९० असलेला सीपीचा गणक सध्यास्थितीत ५४.४२ वर आला. पर्यावरण मंत्रालयाच्या या निर्णयाचे एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, उपाध्यक्ष विष्णूभाई ओझा, प्रदीप बुक्कावार तसेच बंद पडलेल्या सर्व उद्योगांच्या प्रमुखांनी आभार मानले आहे.

उद्योग स्थापनेवरील बंदी हटविण्यासाठी मागील दोन वर्षापासून ना. अहीर व ना. मुनगंटीवार यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पर्यावरण मंत्रालयाने बंदी हटविली आहे. बंदीमुळे अनेक उद्योगांना नुकसान सहन करावे लागले. बंदी हटविल्यामुळे नवीन उद्योग पुन्हा स्थापन होऊन बेरोजगारांना काम मिळेल.
- मधुसूदन रूंगठा, अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन, चंद्रपूर.

Web Title: New industry ban was deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.