नवीन आदेशाने वाढणार ‘रेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:31 AM2021-09-22T04:31:01+5:302021-09-22T04:31:01+5:30
चंद्रपूर : नवीन स्वस्त धान्य दुकानाच्या मंजुरीवर असलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आणखी नवीन स्वस्त ...
चंद्रपूर : नवीन स्वस्त धान्य दुकानाच्या मंजुरीवर असलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आणखी नवीन स्वस्त धान्य दुकाने मिळण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.
नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होतपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आता उठविण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार ५३४ स्वस्त धान्य दुकानांची संख्या आहे. मागील अनेक वर्षांपासून नवीन रेशन दुकानांना परवानगी नव्हती. ती आता मिळालेली आहे. यासंदर्भात प्रत्येक तालुकास्तरावर त्यांच्या भागात किती नवीन दुकानांची गरज आहे. यासाठी अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर जिल्ह्यात किती रेशन दुकाने आणखी वाढणार याची संख्या कळणार आहे. लोकसंख्येचा विचार केला तर ज्या पद्धतीने शहर वाढत आहे. त्यानुसार शहरात रेशन दुकानांची संख्या वाढणार आहे.
पूर्वी सर्व केशरी रेशनकार्डधारकांना धान्य दिल्या जात होते. आता प्राधान्य तसेच अंत्योदय गटांनाच धान्य दिल्या जाते. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे, वन नेशन, वन रेशन योजना सुरु असल्याने या योजनेचाही नवीन दुकाने देताना विचार केला जाणार आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने
बल्लारपूर ६६
भद्रावती १०१
ब्रह्मपुरी १२१
चंद्रपूर ७८
एफडीओ ९५
चिमूर १४१
गोंडपिपरी ८६
जिवती ९०
कोरपना ९७
मूल ६७
नागभीड ११८
पोंभूर्णा ५५
राजुरा १०८
सावली ८५
सिंदेवाही ९५
वरोरा १३१
कोट
शासन आदेशानुसार प्रत्येक तालुक्यातून अहवाल मागविण्यात आला आहे. लोकसंख्या, नवीन दुकानांची गरज, लाभार्थी संख्या आदींचा समावेश आहे. तालुकास्तरावरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नवीन दुकानांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, जिल्ह्यात दुकाने वाढण्याची शक्यता कमीच आहे.
-शालिकराम भराडी
जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर