गडचिरोली-चंद्रपुरातील दर्जेदार सागवान लाकडातून सजली नवी संसद !

By राजेश मडावी | Published: May 27, 2023 04:13 PM2023-05-27T16:13:09+5:302023-05-27T16:14:19+5:30

८०० घनमीटर लाकूड खरेदी : संसदेच्या दोनही सभागृहांसह, १२० कार्यालये, म्युझियम व गॅलरीतही वापर

New parliament decorated with quality teak wood in Gadchiroli-Chandrapur! | गडचिरोली-चंद्रपुरातील दर्जेदार सागवान लाकडातून सजली नवी संसद !

गडचिरोली-चंद्रपुरातील दर्जेदार सागवान लाकडातून सजली नवी संसद !

googlenewsNext

राजेश मडावी

चंद्रपूर : भारताच्या नवीन संसद (सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट) इमारतीचा प्रकल्प आता पूर्णत्वास आला. या देखण्या इमारतीमधील दाेनही सभागृहांसह, १२० कार्यालये, म्युझियम व गॅलरीसाठीदेखील गडचिरोली-चंद्रपुरातील सागवान लाकडाचा वापर करण्यात आला. संसदेच्या अंतर्गत सजावटीचे काम करणाऱ्या नारसी कंपनीने बल्लारपूर येथील वन विकास महामंडळाच्या आगारातून आतापर्यंत ८०० घनमीटर दर्जेदार लाकडाची खरेदी केली.

संसदेच्या नवीन इमारतीचे २८ मे २०२३ रोजी उद्घाटन होणार आहे. नव्या इमारतीला ४ मजले, ६ प्रवेशद्वार, लोकसभेचे एक हजार, तर राज्यसभेचे साधारण ४०० खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे. याशिवाय संसदेतील १२० कार्यालये, म्युझियम, गॅलरीही आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधलेल्या चार मजली नवीन संसद भवनात लाउंज, लायब्ररी व कमिटी हॉलमधील सर्व अंतर्गत सजावटीसाठी ‘ग्लोरी ऑफ फॉरेस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर- गडचिरोली जंगलातील बल्लारपूर येथील वन विकास महामंडळाच्या आगातून ८०० घनमीटर सागवान लाकडाचा वापर करण्यात आला. 

चकाकी आणि नक्षीकामासाठी सर्वोत्तम

नव्या संसद इमारतीसाठी देशभरातील सागवान लाकडाचे नमुने मागवून केंद्र शासनाच्या सीपीडब्लूडी, टाटा कंपनी, नारसी कंपनी व मेट्रालॉजिकल विभागाच्या तज्ज्ञांनी तपासणी केली. त्यात बल्लारपूर आगारातील सागवान सरस ठरला. त्यानंतर पथकाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध आगारांना भेट देऊन लाकडांची पाहणी केली. कीडीपासून मुक्त, हाय ऑयल कन्टेट, चकाकी, ग्रेसपॅटर्न व नक्षीकामासाठी उत्तम असल्याची खात्री पटल्यानंतर नारसी कंपनीने ऑगस्ट २०२१ रोजी पहिल्यांदा १०६. ८१८ घनमीटर लाकूड खरेदी केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही खरेदी ८०० घनमीटरपर्यंत पोहोचली.

बल्लारपूर आगाराला ३ हजार कोटींचा महसूल

भारतात सर्वोत्तम सागवान लाकूड (टेक्टोना ग्रँडिस) बल्लारपूर आगारातच उपलब्ध आहे. त्यामुळे देशभरातून खरेदी होते. २०२१-२२ मध्ये या आगाराने ३ हजार काेटींचा महसूल आणि १६० कोटींचा निव्वळ नफा मिळविला. ७ व ८ जून २०२२ रोजी दोन दिवसांत २२ कोटी सागवान लाकडाची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाल्याची नाेंद आहे. वन विकास महामंडळाने आता सॉन टिंबर विभागातही पाऊल टाकले. पाच सॉ मिल्स कार्यरत असून आल्लापल्लीत नवीन सॉ मिल परवानगी मिळाली आहे.

नव्या संसद इमारतीच्या उभारणीसाठी महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. संसदेच्या अंतर्गत सजावटीसाठी वन विकास महामंडळाच्या बल्लारपूर आगारातून ८०० घनमीटर सागवान लाकडाची खरेदी करण्यात आली. त्यातून संसदेची इमारत अत्यंत देखणी व ऐतिहासिक झाली. ही घटना महाराष्ट्रासाठी खरोखरच गौरवास्पद आहे. 

- गणेश मोटकर, सहाय्यक व्यवस्थापक, वन विकास महामंडळ आगार, बल्लारपूर

Web Title: New parliament decorated with quality teak wood in Gadchiroli-Chandrapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.