बल्लारपूर बसस्थानकावर हार्वेस्टींगसाठी नवीन पाईप लाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:41 AM2019-06-22T00:41:22+5:302019-06-22T00:42:05+5:30
बल्लारपूर येथील आधुनिक बस स्थानकाच्या वॉच टॉवर जवळ पावसाचे पाणी बाहेर टाकण्यासाठी अतिरिक्त पाईपलाईन लावण्यात येत आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत कंत्राटदाराला समज देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारपूर येथील आधुनिक बस स्थानकाच्या वॉच टॉवर जवळ पावसाचे पाणी बाहेर टाकण्यासाठी अतिरिक्त पाईपलाईन लावण्यात येत आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत कंत्राटदाराला समज देण्यात आली आहे. यासंदर्भातील अन्य कंत्राटदारांनादेखील तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्य परिवहन महामंडळाचे चंद्रपूर विभागीय नियंत्रकांनी दिले आहे.
बल्लारपूर येथील आधुनिक बसस्थानक हे संपूर्ण जिल्ह्यात प्रेक्षणीय असे बसस्थानक बनले आहे. या ठिकाणी बसस्थानकाचे संपूर्ण काम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्यात आले आहे. तथापि, रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेमुळे अतिरिक्त पाणी छतावर साचते. यामुळे वॉच टॉवरजवळील सिलिंग निघाले होते. मात्र अतिरिक्त पावसामुळे झालेला हा अपघात असून यामध्ये बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असे म्हणता येत नाही. प्रत्येक नव्या इमारतीमध्ये हार्वेस्टिंग सध्या करणे आवश्यक आहे. हे करीत असताना छतावर पाणी थांबते. पाणी थांबल्यामुळे हा अपघात झाला होता.
या संपूर्ण घटनेची नोंद घेतली असून या इमारतीचे वास्तू विशारद, संबंधित स्ट्रक्चरल इंजिनियर यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली आहे. वॉच टॉवर जवळील छताच्या नालीला दोन मोठे ११० मिलीमीटरचे छिद्र करून पावसाचे पाणी काढण्यासाठी अतिरिक्त पाईप लाईन जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर काम सुरू असताना पाऊस आल्यास नालीमधून रॅलीद्वारे करण्यात आलेल्या छिद्रातून पाणी गळती होऊन सिलिंगमधून पाणी येऊन वॉच टॉवर जवळच्या भागात पाणी गळती होऊ शकते. काम पूर्ण झाल्यावर ही समस्या नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अभूतपूर्व वास्तूची काळजी घेऊ-विभागीय नियंत्रक
कंत्राटदारांना व अन्य संबंधित यंत्रणेला या बसस्थानकाच्या आधुनिकतेला जपताना पुन्हा असे प्रकार होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत बजावण्यात आले आहे. बल्लारपूर बसस्थानक हे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण प्रवासी निवारा असून त्याच्या आधुनिकतेला व सौंदर्यीकरणाला कोणताही बाधा होणार नाही. याबाबत राज्य परिवहन मंडळ काळजी घेईल, असेही विभागीय नियंत्रकांनी स्पष्ट केले आहे.
अंतरिम देयक थांबविले
यासंदर्भात पाऊल उचलत विभागीय नियंत्रकांनी कंत्राटदाराचे अंतिम देयक आणि सुरक्षा रक्कम तसेच संबंधित वास्तुविशारदाचे देयकसुद्धा थांबवून ठेवलेले आहे. प्रवाशांची सुरक्षा तसेच नव्याने उभारलेल्या इमारतीची प्रतिष्ठा यामध्ये तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.