Vidhan Sabha Election 2019; चंद्रपूर जिल्ह्यात नव्या राजकीय उलथापालथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:46 PM2019-10-01T12:46:15+5:302019-10-01T12:48:44+5:30
निवडणुकीसाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख जवळ येताना चंद्रपूर जिल्ह्यात नव्या राजकीय उलथापालथींना चांगला वेग आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : निवडणुकीसाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख जवळ येताना चंद्रपूर जिल्ह्यात नव्या राजकीय उलथापालथींना चांगला वेग आला आहे. वरोऱ्यासह ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आल्याची चर्चा सोमवारी दिवसभर रंगली. या अनुषंगाने भाजप नेते माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार हे उमेदवारीसाठी शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता, तर चंद्रपूरात किशोर जोरगेवार हे उमेदवारीसाठी दिल्लीत रात्री उशिरा काँग्रेस प्रवेश केल्याची माहिती आहे. यामुळे त्यांची उमेदवारीही निश्चित झाली असून घोषणा लवकरच होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी अद्याप घोषणा झालेली नाही. युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला सुरुवातीला १२० जागा जाईल, असे बोलले जात होते. यामध्ये वरोरा विधानसभा मतदार संघ भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक होती. मात्र दिल्लीत नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत शिवसेनेला १२६ जागा मिळतील, असे वृत्त आल्यामुळे वरोरा मतदार संघ हा शिवसेनेच्याच ताब्यात राहतील, हे स्पष्ट झाले आहेत. भाजपच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने या वृत्ताला ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील सहापैकी वरोरा मतदार संघातून २०१४ मध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. यामुळे या जागेवर शिवसेनेचा दावा प्रबळ आहे, असेही या भाजप पदाधिकाºयाने सांगितले. शिवसेनेकडून नुकतेच शिवबंधन बांधलेले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर वा जिल्हा प्रमुख नितीन मत्ते रिंगणात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा मतदार संघ भाजपच्या वाट्याला यावा, यासाठी कंबर कसून असलेले माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचा हिरमोड झाल्याने ते आता उमेदवारीसाठी शिवसेनेचे दार ठोठावतील, अशा चर्चा ऐकायला येत होत्या. मात्र त्यांच्या निकटवर्तीय सूत्राने ही शक्यता फेटाळून लावली.
अशातच ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याची चर्चाही दिवसभर सुरू होती. या नव्या घडामोडींमुळे भाजपात प्रवेश करून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आता या जागेसाठी शिवसेनेकडे गळ घालतील, अशा चर्चाही व्हायरल होत होत्या. याबाबत संदीप गड्डमवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली. चंद्रपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस दमदार उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर कडवी झुंज देणारे किशोर जोरगेवार हे या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याच्या तयारीत होते. काँग्रेसश्रेष्ठीही त्यांच्या नावावर गांभिर्याने विचार करीत होते. अखेर जोरगेवार यांनी दिल्लीत प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केल्याची माहिती आहे. आता जोरगेवारच काँग्रेसचे उमेदवार राहील हे यामुळे स्पष्ट झाले आहेत.
जिल्ह्यात शिवसेनेचा प्रवास खडतर
राज्यात शिवसेना-भाजप युतीचा अध्याय सुरू झाल्यापासून चंद्रपूर जिल्ह्यातील सहापैकी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, चिमूर मतदार संघात शिवसेना १९९० मध्ये पहिल्यांदा लढली होती. त्यावेळी ब्रह्मपुरीतून शिवसेनेचे नामदेव दोनाडकर हे विजयी झालेत. १९९५, १९९९ मध्ये राजुरा व वरोरा हे मतदार संघ शिवसेनेकडे आले. अन्य मतदार संघ भाजपच्या ताब्यात गेली. मात्र शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. २००४ मध्ये भद्रावती-वरोरा आणि चिमूर मतदार संघात शिवसेना लढली. विजय वडेट्टीवार यांच्या रुपाने चिमूरात जिंकली. मात्र अडीच वर्षांतच वडेट्टीवार हे नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेल्याने शिवसेना जिल्ह्यात आमदाराला पोरकी झाली. यानंतर शिवसेनेकडे केवळ वरोरा हे मतदार उरले. २०१४ मध्ये बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर हे शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेचा राजीनामा देऊन काँग्रेसचे खासदार झालेत. यामुळे पुन्हा शिवसेनेची वाताहत झाली. आता वरोरा मतदार संघही हातून गेल्यास शिवसेना जिल्ह्यातूनच हद्दपार होईल, अशी स्थिती निर्माण झाली असताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर ऐनवेळी धनुष्य उचलल्याने शिवसेनेना नवीसंजीवणी मिळाली आहे.