नवीन दराचे खत उपलब्ध नाही, जुन्याच दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:00+5:302021-05-25T04:32:00+5:30
चंद्रपूर जिल्हा हा शेतीप्रधान आहे. खरीप हंगामाला अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बियाणे, ...
चंद्रपूर जिल्हा हा शेतीप्रधान आहे. खरीप हंगामाला अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बियाणे, खत, आदींची जुळवाजुळव सुरू झाली आहे. शेतातील तण काढण्यात शेतकरी गुंतला आहे. दरम्यान, खतांच्या किमतीमध्ये प्रति बॅग ३०० ते ६०० रुपयांची वाढ करण्यात आली. लॉकडाऊनमुळे पूर्वीच शेतकरी संकटात असल्याने पुन्हा भाववाढ झाल्याने या भाववाढीचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात आला. दरम्यान, केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना जुन्याच किमतीत खते देण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी नवीन किमतीनुसार खतविक्री केली जात असून, शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप केला जात आहे. याची सतत्या पडताळण्यासाठी ‘लोकमत’ने काही कृषी केंद्रात खताच्या किमतीबाबत विचारपूस केली. यावेळी नवे खत आले नसल्याने जुन्याच दरात खताची विक्री सुरू असल्याचे समोर आले.
कोट
जुन्याच दराने खताची विक्री करण्याचे निर्देश कृषी व्यावसायिकांना दिले आहेत. शेतकऱ्यांनी खते किंवा बियाणाची खरेदी करताना परवानाधारक कृषी व्यावसायिकांकडूनच करावी, तसेच त्याच्याकडून पक्के बिल घ्यावे. नव्या दराने खत विक्री करताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक, चंद्रपूर.
----
दरवर्षी मे महिन्याच्या शेवटीला खताची खरेदी करीत असतो. मात्र, यंदा आर्थिक अडचणीमुळे खताची खरेदी केली नाही. त्यामुळे खताची विक्री कोणत्या भावाने सुरू आहे. याबाबत माहिती नाही.
-भूषण जुनघरी, शेतकरी.
-------
खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे ऐकले आहे. पूर्वीच लॉकडाऊनने आर्थिक संकट आहे. त्यातच भाववाढ झाली तर शेती करायची कशी, मालाला भाव नसल्याने शेती परवडेनाशी झाली आहे.
- विकास पिंपळकर, शेतकरी,
------
नव्या दाराने खताची विक्री केल्यास कारवाई
केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना जुन्याच किमतीत खते देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर नव्या दराने खताची विक्री करण्यात आल्यास त्या कृषी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. नव्या दराने विक्री होत असल्यास त्याची तक्रार कृषी कार्यालयाकडे करण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केले आहे.
------
खरीप लागवडीचे क्षेत्र
४,१७,०००