परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू
By admin | Published: June 11, 2016 01:12 AM2016-06-11T01:12:05+5:302016-06-11T01:12:05+5:30
जिल्हा रुग्णालयात परिचारिका आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नवजात बाळ दगावल्याची घटना ३० मे रोजी घडली असून,
कारवाईची मागणी : पित्याचा पत्रकार परिषदेत आरोप
चंद्रपूर : जिल्हा रुग्णालयात परिचारिका आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नवजात बाळ दगावल्याची घटना ३० मे रोजी घडली असून, याप्रकरणात संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संदीप यादव कोटरंगे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली.
संदीप कोटरंगे यांनी पत्नी रिना कोटरंगे हिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात २९ मे रोजी सकाळी भरती केले. सकाळी १०.५० वाजता त्यांना पुत्ररत्न झाले. ३० ला लसीकरण करण्यात आल्यानंतर त्याला ताप आला. रात्रीच्या सुमारास अचानक ताप वाढल्यानंतर संदीप कोटरंगे यांच्या पत्नी रिना आणि सासू या दोघींनी स्टॉपरूमकडे धाव घेऊन दरवाजा ठोठावला. परंतु, आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अनेकदा परिचारिकांना आवाज दिला. मात्र, त्यांनी बाळाची प्रकृती तपासली नाही किंवा साधी चौकशीही केली नाही. यातच काही वेळात बाळाची हालचाल थांबली. यानंतर बाळाला घेऊन रिना या नर्सकडे गेल्या असता, उपस्थित परिचारिकांनी त्यांना खालच्या माळ्यावर पाठविले. परंतु, तोपर्यंत बाळ दगावले होता.
परिचारिका आणि डॉक्टर वेळेवर उपस्थित राहणे आणि उपचार करणे आवश्यक असताना जिल्हा रुग्णालयात परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून नेहमीच निष्काळजी केली जात असल्याचा आरोपही संदीप कोटरंगे यांनी यावेळी केला.
याप्रकरणाची तक्रार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुनघाटे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी चार दिवसात चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनपर्यंत याप्रकरणात कुणावरही कारवाई न झाल्याने परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे समर्थन येथे केला जात असल्याचा आरोप संदीप कोटरंगे, रत्नमाला कावळे, नंदा कोटरंगे, राहुल बालमवार, विवेक धोटे, प्रकाश नागरकर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)