पुढील निवडणुकीत ‘हिशोब’ व्याजासह वसूल करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 05:00 AM2021-11-19T05:00:00+5:302021-11-19T05:00:38+5:30
शेतकऱ्यांच्या पिकाला जास्तीत जास्त भाव देता यावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.ओबीसी संदर्भात छगन भुजबळ यांच्याकडे जबाबदारी देऊन आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले होते. त्यांनी ती जबाबदारी चोखपणे सांभाळून ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
राजू गेडाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : विधानसभेच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडून चंद्रपूर जिल्ह्यावर तसा अन्यायच झाला. पक्षातर्फे जागा वाटप करताना त्या ठिकाणी पक्षाची ताकद बघितली जाते. त्यामुळे आम्हाला चंद्रपूरबाबत त्याग करावा लागला. परंतु पुढील निवडणुकीत चंद्रपूरला व्याजासह वसुल करू, असा आशावाद खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मूल येथील क्रीडा संकुलात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऊर्जा राज्यमंत्री तथा संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री सुबोध मोहिते, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राजू करेमोटे, रमेश बंग, प्रकाश गजभिये, ॲड. बाबासाहेब वासाडे, विदर्भाचे ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे, शोभाताई पोटदुखे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, युवक रॉका अध्यक्ष नितीन भटारकर, जिल्हा महिला रॉका अध्यक्ष बेबीताई उईके, सुमित समर्थ आदी उपस्थित होते.
यावेळी खा. पवार पुढे म्हणाले, देशाच्या राजकारणात चंद्रपूर जिल्ह्याचा सहभाग असून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंराव चव्हाण देशाचे संरक्षण मंत्री झाले तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मा.सा. कन्नमवार यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी ती समर्थपणे सांभाळली. अशा चंद्रपूर जिल्ह्यात नेते दुसऱ्या पक्षात गेले तरी त्यांची चिंता करू नका. मी मुख्यमंत्री असताना ६० आमदारांपैकी ५४ सोडून गेले. मात्र मी हिंमत सोडली नाही. त्याच जोमाने आमदार निवडून आणले. येत्या नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के उमेदवारी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. धानाला भाव नसल्याने धान उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. जे केवळ खरीप हंगामात एकदाच धानाचे उत्पादन घेतात. दुबार पीक घेत नाही, अशांची स्थिती आणखी बिकट आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला जास्तीत जास्त भाव देता यावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.ओबीसी संदर्भात छगन भुजबळ यांच्याकडे जबाबदारी देऊन आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले होते. त्यांनी ती जबाबदारी चोखपणे सांभाळून ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. यावेळी राकॉंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला अध्यक्ष बेबीताई उईके, युवक अध्यक्ष नितीन भटारकर यांनीही मार्गदर्शन केले.
प्रत्येक घटकाला न्याय देणार : प्रफुल्ल पटेल
देशाच्या राजकारणात शरद पवार यांचे स्थान अग्रस्थानी आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळावा, यासाठीच ते सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे कुठलेही राजकारण न करता समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, यासाठी कार्यकर्त्यांनीही प्रयत्न करावा, असे आवाहन माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. पक्ष विस्तारासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा सल्लाही दिला
शरद पवार यांचे चंद्रपुरातील आजचे कार्यक्रम
- खासदार बाळू धानोरकर आयोजित एनडी हाॅटेल येथे सकाळी ९.३० वाजता संवाद उद्योजकांशी कार्यक्रमात उपस्थिती दर्शविणार आहेत.
- सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजीव गांधी कामगार सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतील.
- दुपारी १२ वाजता जिल्हा राकाॅंतर्फे जनता महाविद्यालयात ग्रामीण कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन.
- दुपारी ३.४५ वाजता जनता महाविद्यालयात पत्रकार परिषद.