येत्या साडेतीन वर्षात मूल तालुका सिंचनयुक्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:00 AM2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:32+5:30
चिरोली या गावात ब्रिज कम बंधारा बांधण्याची कल्पना प्रमोद बोंगीरवार यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडली. आ. मुनगंटीवार यांनी सदर ब्रिज कम बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला व चिरोलीवासीयांसाठी मोठी सोय उपलब्ध झाली. प्रमोद बोंगीरवार यांनी याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल चिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : येत्या साडेतीन वर्षात मूल तालक्यात सिंचनाच्या मोठया सोयी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मूल तालुक्यातील चिरोली या गावात सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रमोद बोंगीरवार यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमोद बोंगीरवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, चिरोली ग्रामपंचायतीचे सरपंच शालिक दहिवले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. चिरोली या गावात ब्रिज कम बंधारा बांधण्याची कल्पना प्रमोद बोंगीरवार यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडली. आ. मुनगंटीवार यांनी सदर ब्रिज कम बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला व चिरोलीवासीयांसाठी मोठी सोय उपलब्ध झाली. प्रमोद बोंगीरवार यांनी याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल चिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमोद बोंगीरवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताला आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, कोणत्याही विकासकामांमध्ये पाण्याची सोय ही विशेष महत्त्वाची आहे. कारण त्याचा फायदा नागरिकांना दिर्घकाळ होतो. दोन वर्षांपूर्वी प्रमोद बोंगीरवार यांनी सदर बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत इच्छा व्यक्त केली होती. या बंधाऱ्यासाठी मी प्रयत्नपूर्वक निधी मंजूर केला. आज हा बंधारा राज्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. मारोडा रस्त्यावरसुध्दा असाच ब्रिज कम बंधारा बांधण्यात आला असून त्याची किंमत केवळ नऊ लाख रू. आहे. माझ्या मतदार संघात प्रत्येक ब्रिजवर असा बंधारा बांधलाच पाहिजे असा आग्रह मी विभागाकडे करणार आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.