रात्रपाळीत अधिकारी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:24 AM2017-12-18T00:24:06+5:302017-12-18T00:25:33+5:30

मूल तालुक्यातील मारोडा, राजोली, बेंबाळ आणि चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी ९५ टक्के कर्मचारी कार्यरत आहेत.

Night officer missing | रात्रपाळीत अधिकारी गायब

रात्रपाळीत अधिकारी गायब

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीण भागातील रुग्णांनी जावे कुठे ? : तालुक्यातील आरोग्य केंद्रांमधील वास्तव

भोजराज गोवर्धन ।
आॅनलाईन लोकमत
मूल : मूल तालुक्यातील मारोडा, राजोली, बेंबाळ आणि चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी ९५ टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु यापैकी बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. रात्रपाळीत तर या केंद्रांमध्ये कुणीच राहत नसल्याचे लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. या प्रकारामुळे रुग्णांची चांगलीच हेळसांड होत आहे.
तालुक्यातील मारोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. परंतु एका डॉक्टराच्या भरोशावर मारोड्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य संध्या गुरुनुले यांच्या या क्षेत्रामधील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची नेहमीच कमतरता असते. या आरोग्य केंद्रातील एक महिला डॉक्टर मागील एक वर्षापासून गैरहजर आहे. परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग त्या डॉक्टरांना अभय देत आहे. मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. मडावी हे कार्यरत आहे तर राजोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चरपे हे याठिकाणी बुधवार आणि गुरुवार यादिवशी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे. तर भादुर्णी येथील उपकेंद्रामध्ये डॉ. माधुरी टेंभे तर राजगड उपकेंद्रामध्ये डॉ. मिना मडावी या कार्यरत आहेत. मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले अनेक कर्मचारी मुख्यालयाबाहेर राहतात, हे लोकमतच्या पाहणीत आढळून आले आहे. रात्र पाळीत तर हे अधिकारी सेवेत नसतातच. याठिकाणी परिचर दोन आणि वाहन चालकाचे एक पद रिक्त आहे.
बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी डॉ. निलंगेकर यांची बदली झाल्याने त्यांच्या ठिकाणी गोवर्धन येथील अ‍ॅल्युपेथीक उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शितलप्रसाद महेशकर यांनी पदभार स्वीकारलेला आहे. याठिकाणी डॉ. जुनघरे कार्यरत आहे. तर राजोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सुमेध खोब्रागडे कार्यरत आहे. येथील प्रशासन व्यवस्थित असल्यामुळे याठिकाणी रुग्णांची कोणतीही तक्रार असल्याचे दिसून आले नाही, याठिकाणी परिचर एक पद रिक्त आहे. मूल तालुक्यातल चारही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेले असून काही आरोग्य केंद्रात अस्वच्छता पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ११० गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी मूल तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रासोबत १६ उपकेंद्र, एक आयुर्वेदीक तर तीन अ‍ॅल्युपॅथीक आरोग्य केंद्र चालविले जात आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही लक्ष नाही
मारोडा आरोग्य केंद्रातून अनेक रुग्णांना मूल- चंद्रपूरला रेफर केले जाते. याबाबत अनेकदा तालुका वैद्यकीय अधिकाºयांकडे तक्रार केली. परंतु तालुका वैद्यकीय अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची प्रतिक्रिया मारोडा ग्रामपंचायतचे सदस्य पप्पु पुल्लावार यांनी दिली.
चिरोली केंद्रात अस्वच्छता
चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० टक्के पदे भरण्यात आलेली आहेत. परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता लोकमतच्या पाहणीत दिसून आली. चिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर कन्नाके यांची सिरोंचा येथे पदोन्नती झाली असून त्यांच्याठिकाणी डॉ. रायपुरे हे नुकतेच रुजू झालेले आहे. याठिकाणीही परिचराचे दोन पदे रिक्त आहेत.
मारोड्याचे आरोग्य केंद्र वाऱ्यावर
मा.सा. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभार वाऱ्यावर सुरु आहे. याठिकाणी औषधासाठा नाही. आरोग्य कर्मचारी आलेल्या रुग्णाशी सौजन्याने बोलत नाही, अशा अनेक तक्रारी दिसून आल्या.

Web Title: Night officer missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.