मास्तरांच्या गावातील निकेशची विदेश भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:21 PM2018-05-15T23:21:57+5:302018-05-15T23:22:12+5:30
पांजरेपार या लहानश्या गावातील निकेश वामन उरकुडे हा युवक नुकताच युनायटेड किंग्डम (युके) देशात इंजिनिअर म्हणून नोकरीसाठी रवाना झाला. त्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : पांजरेपार या लहानश्या गावातील निकेश वामन उरकुडे हा युवक नुकताच युनायटेड किंग्डम (युके) देशात इंजिनिअर म्हणून नोकरीसाठी रवाना झाला. त्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पांजरेपार या गावाची तशी मास्तरांचे गाव म्हणून पंचक्रोशीत ओळख आहे. ७०० ते ८०० लोकसंख्येच्या या गावात किमान ६० ते ६५ तरी व्यक्ती शिक्षकी पेशात आहेत. यात जि.प.च्या शिक्षकांपासून तर प्राध्यापकांचाही समावेश आहे. गावाची अशी पार्श्वभूमी असलेल्या निकेशचे प्राथमिक शिक्षण पांजरेपार येथीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर दहावी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले. पुढे अकरावीला जनता विद्यालय नागभीड येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला व बारावीमध्ये उत्तम यश प्राप्त करत अमरावती येथून बी.ई. ची पदवी घेतली. त्यानंतर विविध कंपन्यांमध्ये नोकरी करत तो नुकताच युनायटेड किंग्डम या देशात मास्कटेक कंपनीत सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीसाठी रवाना झाला. निकेशच्या घरची परिस्थिती सामान्य आहे. घरी शेती आणि छोटासा किराणा दुकान असून शेती आणि किराणा दुकानात तो स्व:ताही काम करायचा. पण परिस्थितीला आड न येऊ देता, निकेशने जिद्दीने परिस्थितीशी लढा देत त्याने यश संपादन केले आहे.
निकेश लहानपणापासूनच मेहनती व जिद्दी होता. त्याने परिस्थितीशी झुंज देऊन यश संपादन केले. एखादी गोष्ट त्याने करायची ठरविली की, ती तडीस कशी न्यायची, या खटपटीत तो असायचा.
- सुनील नवघडे
निकेशचे प्राथमिक शिक्षक