शिवणीवासीयांकडून निलगिरी संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:59 PM2018-05-22T22:59:20+5:302018-05-22T22:59:20+5:30
शिवणी ग्रामपंचायतने दोन वर्षांपूर्वी गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला निलगिरीची अनेक झाडे लावून जगविली. ही झाडे आता डेरेदार झाली असून यातून वृक्ष संवर्धनाला गती मिळाली आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेमुळे हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : शिवणी ग्रामपंचायतने दोन वर्षांपूर्वी गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला निलगिरीची अनेक झाडे लावून जगविली. ही झाडे आता डेरेदार झाली असून यातून वृक्ष संवर्धनाला गती मिळाली आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेमुळे हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे ओळखून निलगिरी लागवड करण्यात आली. त्यासाठी ग्रामपंचायतने नागरिकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे गावात प्रवेश करताच ही डौलदार झाडे लक्ष वेधून घेतात. ग्रामपंचायतने गावातील प्रवेशद्वाराच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला निलगिरीच्या झाडांचे वृक्षारोपण संवर्धनाकडे लक्ष दिले. मुख्य रस्त्याच्या अगदी कडेला असणारी ही झाडे २५ ते ३० फूट उंचीपर्यंत वाढली आहेत. राज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवडीला शिवणी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व नागरिकांनी प्रतिसाद दिला. सामूहिक प्रयत्नातून मुख्य रस्त्यावर २०० झाडांची लागवड केली. ग्रामपंचायतने या रोपट्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली होती. त्याचेच फलित म्हणून निलगिरीची झाडे डौलाने उभी दिसत आहेत. गावात प्रवेश करताच ही झाडे मनाला मोहून टाकतात. शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांमध्ये लोकसहभाग नसल्याने अंमबजावणी करताना अडचणी येतात. केवळ योजना सुरू करून उपयोगाचे नाही. तर गावाच्या हितासाठी प्रत्येक व्यक्तीने त्यामध्ये सहभाग दर्शविणे महत्त्वाचे आहे. शिवणी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतला सहकार्य केल्याने वृक्षसंवर्धनाचा उपक्रम यशस्वी होवू शकला. तालुक्यातील अन्य गावांनीही अशी मोहीम सुरू करावी.