निम्या अंगणवाडी केंद्रांचे शौचालय नादुरूस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:20 PM2018-05-15T23:20:22+5:302018-05-15T23:20:22+5:30
चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा श्रीगणेशा अंगणवाडी केंद्रातून होत असते. अंगणवाडीतूनच शाळेत येण्याची बालकांत आवड निर्माण केली जाते.
भोजराज गोवर्धन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा श्रीगणेशा अंगणवाडी केंद्रातून होत असते. अंगणवाडीतूनच शाळेत येण्याची बालकांत आवड निर्माण केली जाते. मात्र या अंगणवाडी केंद्रातून बालकांना मुलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे वास्तव मूल तालुक्यातून दिसून आले. तालुक्यातील निम्या अंगणवाडी केंद्रामधील शौचालये नादुरूस्त असून याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मूल तालुक्यातील १५४ अंगणवाडी केंद्रापैकी ११ ठिकाणी आजही स्वतंत्र इमारत नाही. ज्याठिकाणी अंगणवाडी आहे, त्यातील ३२ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची स्थिती बिकट आहे. तर ३० अंगणवाड्यात शौचालयच नाही. काही अंगणवाड्यात पाण्याचीही व्यवस्था नाही. ग्रामीण भागात एकात्मीक बालविकास सेवा योजनेतून शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी अंगणवाड्या, मिनी अंगणवाड्या चालविल्या जातात. कुपोषण कमी करणे, त्यासाठी बालकांना पूरक पोषण आहार देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपक्रमही राबविले जातात. मात्र याच अंगणवाड्यांमध्ये बालकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचा विरोधाभास आहे. एकीकडे विकासाचे ढोल वाजविणे सुरू असताना अंगणवाड्यातील बालकांना पिण्याचे पाणीही मिळत नाही ही, शोकांतिका आहे. विशेष म्हणजे, अंगणवाड्यातील बालकांच्या आरोग्यासाठी प्रचंड खर्च केला जातो. त्यातून नेमका कोणाचा विकास साधला जात आहे, ही बाबही शोधणे गरजेचे आहे. तालुक्यातील चिचोली, दाबगांव मक्ता, विरई, नवेगाव आणि येजगाव येथे मीनी अंगणवाडी आहे. करवन कोटा येथील अंगणवाडीच्या बांधकामासाठी एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत. तर बोरचांदली येथे दोन आणि नांदगाव येथे तीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अंतिम टप्पात आहे.
ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्र आहेत. परंतु, शौचालय नाही, त्याठिकाणी शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे. जुने शौचालय दुरूस्तीसाठीही प्रस्ताव पाठविण्यात आले असून अंगणवाडी केंद्रात पाण्याची सोय व्हावी यासाठी गावातील सरपंच, ग्रामसेवकांची भेट घेतली.
- एस. एस. पवार
एकात्मीक बालविकास प्रकल्प अधिकारी, मूल.