वाहनासह नऊ लाखांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:35 AM2019-08-11T00:35:03+5:302019-08-11T00:35:29+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळेलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आइचर गाडीसह नऊ लाखांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारच्या मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान जुनोना जंगल परिसरात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळेलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आइचर गाडीसह नऊ लाखांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारच्या मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान जुनोना जंगल परिसरात करण्यात आली. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. रवी मुर्तीराम आवळे रा. बल्लारपूर, शांतकुमार धनराज उपरे रा. बाबूपेठ चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
जुनोना जंगल परिसरात आइचर वाहनाने दारूसाठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर भरारी पथकाने जुनोना जंगल परिसराकडे सापळा रचला. सहा तास प्रतीक्षा केल्यानंतर रात्री १ वाजताच्या सुमारास सदर वाहन जुनोना जंगल परिसरात येताना दिसले. पोलिसांनी सदर वाहनास थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहन न थांबविता जंगलात पसार झाले. पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग करुन वाहन थांबवले. वाहनाजवळ जाऊन वाहनाची झडती घेतली असता वाहनात देशी दारूचे ५४ बॉक्स आढळून आले. यावेळी गाडीमध्ये बसून असलेले रवी आवळे, शांतकुमार उपरे यांना अटक केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद भोयर, चंदन भगत, राहुल अत्रे, पुठ्ठलवार, चेतन अवचट, संदीप राठोड, अमोल भोयर यांनी केली.
क्रांतीदिनी चिमुरात ९७ हजारांचा दारूसाठा जप्त
चिमूर : देशात क्रांतिदिन साजरा होत असताना चिमूर पोलिसांनी आझाद वार्डातील एका घरी धाड टाकून ९७ हजार ८०० रुपयांची दारु जप्त केली. याप्रकरणी पती व पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पती नंदू मोहिणकार याला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. आझाद वार्ड येथे दारुची विक्री होत असल्याची माहिती गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी मोहिणकार यांच्या घरी धाड टाकली. यावेळी ६१ हजार ८०० रुपये किंमतीच्या १८० एमएलच्या ६१८ नग देशी दारूच्या बॉटल, ३६ हजार रुपये किंमतीच्या १२० नग इंपिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या बॉटल असा ९७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नंदू मोतीराम मोहिणकार याला अटक केली. ही कारवाई चिमूरचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, नापोशी किशोर बोढे, पोशी सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, कुणाल राठोड, मपोशी उज्वला परचके, विजय उपरे यांनी केली.