घरफोडीत नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास
By Admin | Published: January 25, 2016 01:25 AM2016-01-25T01:25:01+5:302016-01-25T01:25:01+5:30
स्थानिक शास्त्रीनगर परिसरात घरफोडी होऊन चोरट्यांनी नऊ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने सामान्य
चंद्रपूर: स्थानिक शास्त्रीनगर परिसरात घरफोडी होऊन चोरट्यांनी नऊ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने सामान्य नागरिकांसह पोलीस यंत्रणाही हादरून गेली असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
शास्त्रीनगर परिसरातील पारूल किरीट शुक्ला यांच्या घरी ही धाडसी चोरी झाली. त्यांचे पती, मुलगा व सून एका लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले होते. शनिवारी पारूल व त्यांचा मुलगा असे दोघेच घरी होते. रात्री पारूल व त्यांचा मुलगा घराच्या वरच्या माळ्यावर झोपून होते. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला व घरातील आलमारीत ठेऊन असलेले ४० तोळ्यापेक्षा अधिक सोन्या-चांदीचे दागिने, रोख पाच हजार रुपये व मोटारसायकल असा ९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पारूल शुक्ला यांनी यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट
४अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत चव्हाण, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील ताजने, बल्लारपुरचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. सोबतच रामनगर, शहर पोलीस ठाणे, बल्लारपूर, दुर्गापूर येथील डी.बी.पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही भेट देऊन पाहणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या सूचनेवरून रामनगर, चंद्रपूर शहर व दुर्गापूर पोलीस ठाण्यातील डी.बी.पथकही तपासकामी लागले आहे.
चोरीतील मोटारसायकल भद्रावतीत सापडली
४पारूल शुल्का यांच्या घरासमोर ठेऊन असलेली मोटारसायकही चोरट्यांनी लंपास केली. आज दुपारी सदर मोटारसायकल भद्रावती शहराजवळ रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे दिसून आले. तिला ताब्यात घेण्यासाठी रामनगर पोलिसांची चमू भद्रावतीकडे सायंकाळी रवाना झाली.
डॉग स्कॉड, ठसे तज्ज्ञ
घटनास्थळावर
४घटनेनंतर घटनास्थळावर डॉग स्कॉड दाखल झाले. मात्र काही अंतरापर्यंत माग काढत हे डॉग स्कॉड माघारी फिरले. घटनास्थळावर ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.