नऊ हजार रूग्णांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:02 AM2017-12-17T00:02:06+5:302017-12-17T00:03:22+5:30
१४ दिवसांपूर्वी बल्लारपुरात नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या फिरत्या रूग्णालयाचा नऊ हजार ६४१ लोकांनी लाभ घेतला आहे. राज्य शासन, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनान्स व इम्पॅक्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची सांगता १९ डिसेंबरला होणार आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : १४ दिवसांपूर्वी बल्लारपुरात नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या फिरत्या रूग्णालयाचा नऊ हजार ६४१ लोकांनी लाभ घेतला आहे. राज्य शासन, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनान्स व इम्पॅक्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची सांगता १९ डिसेंबरला होणार आहे. जगात लाईफ लाईन एक्स्प्रेस म्हणून प्रसिध्द असलेली ही गाडी १९ डिसेंबरला चंद्रपूर जिल्हावासियांचा निरोप घेणार आहे, अशी माहिती संयुक्त माहिती उपप्रकल्प अधिकारी अनिल प्रेमसागर यांनी दिली.
इम्पॅक्ट या अशासकीय संस्थेचे पदाधिकारी सुरुवातीला गावोगावी जावून लोकांना वैद्यकीय सेवा देत होते. परंतु नंतर ग्रामीण भागातील जनतेपर्यंत रूग्णालय पोहचविण्यासाठी १६ जुलै १९९१ ला लाईफ लाईन एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. भारतीय रेल्वेच्या मदतीने आतापर्यंत १८६ प्रकल्प राबविण्यात आले. बल्लारपुरात ही एक्स्प्रेस पोहचल्यानंतर हजारो रूग्णांनी हजेरी लावली. यातील बºयाच रूग्णांवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. एकूण नऊ हजार ६४१ रूग्णांची नोंद या १४ दिवसात झाली आहे. ५८४ रूग्णांच्या डोळयांवर शस्त्रक्रिया करण्यात येवून दोन हजार ९४ रूग्णांना चष्मेवाटप करण्यात आले. नाक, कान, घसा संदर्भात तक्रारी असलेले एक हजार १५० रूग्ण येथे आले. त्यातील ८२ गरजू रूग्णांवर तर २९२ रूग्णांच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
ना. मुनगंटीवारांचे नियोजन कौतुकास्पद
इम्पॅक्टने आतापर्यंत १९ राज्यातील किमान १५० जिल्हयात फिरते रूग्णालय नेले आणि किमान १० लाख रूग्णांनी याचा लाभ घेतला. बºयाचवेळा कुतुहलामुळे या रूग्णालयाला पाचारण करण्यात येते आणि नंतर सर्वांची तारांबळ उडते. एक्स्प्रेस आली की नंतर आयोजकातील बरेच लोक पसार होतात. हा अनुभव आहे. परंतु बल्लारपुरात तसे झाले नाही. तालुकास्थानी ही गाडी असताना कल्पनेपलिकडील संख्या गाठता आली. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या नियोजनामुळे ते शक्य होऊ शकले. कोणताही त्रास येथे प्रकल्प चालविताना झाला नाही, अशी प्रतिक्रिया इम्पॅक्टचे उपप्रकल्प प्रमुख अनिल प्रेमसागर यांनी दिली.