९० टक्के कोल्हापुरी बंधारे निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:37 PM2017-12-10T23:37:34+5:302017-12-10T23:38:00+5:30
आॅनलाईन लोकमत
कोठारी : सिंचनावर विशेष लक्ष केंद्रीत करुन या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे व उत्पन्नात कमालीची वाढ व्हावी. तसेच नापिकीने शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागू नये, यासाठी कोठारी परिसरात शेकडो बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र अधिकाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरातील ९० टक्के बंधारे निकामी झाल्याचे वास्तव पुढे आले आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातर्फे तसेच कृषी विभागाअंतर्गत बारमाही वाहणाऱ्या जिवंत नाल्यावर, हंगामी वाहनाºया नाल्यावर, याशिवाय मुळीच न वाहनाऱ्या नाल्यावर कोल्हापुरी, सिमेंट प्लग बंधाऱ्याची निर्मिती ठिकठिकाणी करण्यात आली. या बंधाऱ्याचे पाणी अडवून शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा प्रयत्न होता. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. बंधारे बांधकाम पूर्ण झाले. शासनाच्या रेकॉर्डवर शेतकऱ्यासाठी सिंचनाची तजवीज केल्याची नोंद झाली. मात्र वास्तविक चित्र वेगळेच आहे. शेती सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या बंधाºयाची देखरेख संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली नाही. परिणामी आजघडीला हे बंधारे पाणी अडविण्याऐवजी पाणी वाहण्यासाठी वाट मोकळी करताना दिसत आहे. अनेक बंधारे पडले आहेत. त्याच्या भिंती पडून विखुरल्या आहेत. पाणी अडविण्यासाठी बंधाºयावर टाकण्यात आलेल्या पाट्या चोरीला गेल्या आहेत.
चौकशी व्हावी
सिंचन विभाग, कृषी विभाग व वनविभागांतर्गत बांधण्यात आलेल्या मागील चार वर्षाचे बंधारे तपासणी, प्रत्यक्ष पाहणी करावी व जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर व बंधारे बांधकाम केलेल्या कंत्राटदारांवर, निरीक्षण करणाºया अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
वनविभागाचे बंधारेही निकामी
मागील चार वर्षापासून वनविभागाच्या जंगल क्षेत्रातील नाल्यात बंधारे बांधकामावर विशेष जोर देण्यात आला. या जंगलाचा विकास व वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये व त्यात वन्यप्राण्यांचा जीव जाऊ नये, यासाठी वनक्षेत्रात बंधारे बांधकामावर शासनाने निधी उपलब्ध करुन दिला. मात्र याही विभागातील खांबुगिरी व अधिकाºयांच्या दुर्लक्षतेमुळे अनेक बंधारे केवळ शोभेची वास्तू ठरत आहे. ज्या उद्देशाने सिमेंट प्लग, गॅबीन, दगडी बंधारे बांधण्यात आले. त्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आल्याचे वास्तव्य चित्र आहे.