निर्मलग्राम, तंटामुक्त गाव समित्या कागदावरच
By admin | Published: December 29, 2014 01:11 AM2014-12-29T01:11:55+5:302014-12-29T01:11:55+5:30
गाव तंटामुक्त, निर्मलग्राम होतात, दारुबंदी केली जाते. परंतु, खऱ्या अर्थाने ही यशस्वीता कागदोपत्रीच दिसून येते.
कोरपना : गाव तंटामुक्त, निर्मलग्राम होतात, दारुबंदी केली जाते. परंतु, खऱ्या अर्थाने ही यशस्वीता कागदोपत्रीच दिसून येते. जी गावे तंटामुक्त झाली त्याच गावात हाणामाऱ्या होत असून निर्मल ग्राम झालेल्या गावातच चोरटी दारु विक्री केली जात आहे. त्यामुळे पुरस्काराचे महत्व सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र दिसून येते.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध अभियानाच्या माध्यमातून शासन ग्रामीण भागातील गावागावात शांतता, स्वच्छता व व्यसनाधिनता दूर करण्याचा प्रयत्न व्यावसायिकतेच्या स्वरूपात स्वीकारल्याचे दिसून येते. तंटामुक्तीचा पुरस्कार असो किंवा निर्मलग्रामचा पुरस्कार असो, गावांना प्राप्त झाल्यानंतर गावातील पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी त्या समस्यांकडे लक्ष दिलेले दिसून येत नाही.
कोणत्याही समस्यांचे उच्चाटन करण्यासाठी शासनाकडून नेहमीच प्रयत्न केला जाते. मात्र ज्यावेळी कोणतीही योजना किंवा अभियान गावपातळीवर राबविण्यात येते त्यावेळी त्या योजनेकडे व अभियानाकडे पाहण्याचा हेतू बदलतो. अभियानात सहभागी व्हायचं आणि पुरस्कार मिळवायचा, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले जाते. अधिकारी गावात येणाच्या दिवशी गावात स्वच्छता करून अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी गावकरी जमा होतात. संपूर्ण गावाला नववधू सारखे सजविले जाते. मात्र ती खरी वास्तविकता नसते.
लाखो रुपयांचे पुरस्कार मिळवायचे आणि मग पुन्हा येरे माझ्या मागल्या... अशी अवस्था अनुभवायास मिळते. पुरस्काराचे पवित्र्य जपन्यासाठी ज्या गावाना निर्मलग्रामचे असो किंवा तंटामुक्तीचे पुरस्कार मिळाले आहे. त्या गावात केरकचरा जमा होऊ नये, गावात तंटे निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी प्रयत्नरत राहीले पाहिजे. मात्र याच्या उलट परिस्थिती दिसते. निर्मलग्राम झालेल्या गावात कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेली गटारे दिसतात. तर तंटामुक्त झालेल्या गावात तंटे त्याच बरोबर दारुबंदी झालेल्या गावात पुन्हा चोरटी दारु विक्री आदी प्रकार दिसून येत आहेत. काही मुठभर लोकांमुळे अनेक गावाना मिळालेल्या पुरस्काराला कलंक लागला आहे. (शहर प्रतिनिधी)