मनपातर्फे निर्माल्य कलश व कृत्रिम विसर्जन कुंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:35 AM2021-09-09T04:35:09+5:302021-09-09T04:35:09+5:30
चंद्रपूर : श्री गणेशाचे शुक्रवारी आगमन होत आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या ...
चंद्रपूर : श्री गणेशाचे शुक्रवारी आगमन होत आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी मनपा प्रशासनाने तयारी केली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मूर्तींवर पूर्णतः बंदी आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा यासाठी निर्माल्य कलश व कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात येत आहेत. दरम्यान, शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी बुधवारी मनपाच्या पथकाने मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानात तपासणी केली.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देण्यात आला आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, अथवा मनपा प्रशासनातर्फे झोननिहाय तयार करण्यात आलेले कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलश यांचा विसर्जनाकरिता अगत्याने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मूर्तींवर पूर्णतः बंदी आहे. त्यात पीओपी मूर्तींची निर्मिती करणे, बाहेरून आयात करणे व विक्री न करणे आदी बाबींचा समावेश आहे. याबाबतीत महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व मूर्तिकारांची बैठकही घेण्यात आली होती. या नियमांचे कठोर पालन व्हावे, यादृष्टीने पोलीस विभाग, मूर्तिकार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, स्वच्छता निरीक्षक यांचे संयुक्त पथक पाहणी करत आहे. दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठेही पीओपी मूर्तींची विक्री, साठा व खरेदी करू नये, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीची मूर्ती २ फुटाच्या मर्यादेत असावी. यावर्षी मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास मनपाच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे, पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.