मनपा निवडणुकीच्या रणकंदनाला प्रारंभ
By Admin | Published: April 2, 2017 12:33 AM2017-04-02T00:33:54+5:302017-04-02T00:33:54+5:30
२२ मार्च रोजी महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
चंद्रपूर : २२ मार्च रोजी महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तेव्हापासून विविध राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांची धावपळ वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ एप्रिल आहे. राष्ट्रवादीनंतर भाजपानेही आपली पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या यादीवरही आज रात्री उशिरापर्यंत मुंबईत शिक्कामोर्तब होऊन रविवारी २ एप्रिलला सर्वच राजकीय पक्षांचा पेटारा उघडणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ६६ जागांकरिता १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. २२ मार्चला या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता बुधवारपासून चंद्रपूर शहरात लागू झाली आहे. १९ एप्रिलला मतदान तर २१ ला मतमोजणी होणार आहे.
पूर्वी नगरपालिका असलेल्या चंद्रपूर शहराला महानगराचा दर्जा मिळल्यानंतर २०११ मध्ये चंद्रपूर महानगर पालिकेची स्थापना झाली. त्यासाठी पहिली निवडणूक एप्रिल-२०११ मध्ये झाली होती. आता ही मुदत संपत असल्याने दुसरी निवडणूक जाहीर झाली आहे. महापौरपद अडीच वर्षासाठी असल्याने पहिल्या महापौर काँग्रेसच्या संगीता अमृतकर झाल्या. त्यानंतर महापौरपदाच्या झालेल्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये फुट पडली. काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा गट भाजपाला जाऊन मिळाला. त्यांच्या पाठिंब्यावर आणि भाजपाची मदत घेवून काँग्रेसच्या राखी कंचर्लावार या महापौर झाल्या.
मुळात त्या काँग्रेसच्या असल्या तरी नंतरच्या काळात त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. त्यामुळे आपोआपच ही महानगर पालिका भाजपाच्या ताब्यात गेली. आता या महानगरपालिकेसाठी पुन्हा सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येत आहे. भाजप आणि काँग्रेसकडे ६६ जागांसाठी शेकडो इच्छुकांनी अर्ज केले आहे. त्यातून योग्य उमेदवारांची चाचपणी करताना या राजकीय पक्षांना बराच विलंब लागत आहे. २७ मार्चपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारणे सुरू झाले आहे. मात्र पहिल्या चार दिवसात एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. अनेकांनी केवळ आॅनलाईन अर्ज भरून ठेवला आहे.
विशेष म्हणजे, नामनिर्देशनपत्र स्वीकारणे सुरू होऊन चार दिवस लोटल्यानंतरही राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली. अजूनही ही अस्वस्था कायम आहे. दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे शनिवारी जवळजवळ सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होईल, असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. काँग्रेसच्या यादीवर अजूनही मुंबईत विचारविनिमय सुरू आहे. दरम्यान आज शनिवारी रात्री ७.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ भाजपानेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेनेची यादीही निश्चित झाल्याची माहिती आहे. मात्र पक्षाकडून रविवारीच ही यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कॉग्रेस पक्षात दोन-चार जागांसाठी वाद सुरू आहे. या जागांसाठी मुंबईत चर्चा सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)
असा आहे निवडणूक कार्यक्रम
मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली असून ३ एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सकाळी ११ ते ३ या वेळात अर्ज स्वीकारले जाणार असून २८ मार्चला गुडीपाडव्यानिमित्त सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाही. मात्र रविवार २ एप्रिल रोजी सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. ५ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक ७ एप्रिल आहे. तर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ८ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
‘त्या’ नगरसेवकांचे समायोजन
मागील महापौर पदाच्या निवडणुकीत मनपाच्या काँग्रेस नगरसेवकांमध्ये फुट पडून दोन गट तयार झाले. यातील लहामगे-तिवारी गटातील १२ नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा देत राखी कंचर्लावार यांना महापौर बनविले. या १२ नगरसेवकांना यंदाच्या निवडणुकीसाठी पक्षाने तिकीट देऊ नये, अशी मागणी पुगलिया गटाकडून करण्यात आली होती. मात्र विधानसभेतील विरोधी पक्षातील गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी मात्र या १२ नगरसेवकांना तिकीट मिळावी म्हणून प्रयत्न चालविले होते. माजी खासदार नरेश पुगलिया, आ. विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक नेते व सर्वच विद्यमान नगरसेवक गुरुवारीच मुंबईला रवाना झाले होते. आज दिवसभर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत तिकीट वाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेअंती त्या १२ नगसेवकांपैकी बहुतेकांना तिकीट देण्यात आल्याची माहिती आहे.
शिवसेना कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा
काँग्रेस आणि भाजपाकडून तिकीट मिळत नसल्याचे संकेत मिळताच अनेक इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेची वाट धरली आहे. शिवसेनाही या बंडखोरांना सामावून घेताना दिसून येत आहे. आज शनिवारी शिवसेनेची यादी जाहीर होईल, असे वाटत होते. मात्र रात्रीपर्यंत शिवसेना गोपनीयताच बाळगून आहे. यादी जाहीर करण्याची वेळ आली असताना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात मात्र आज इच्छुकांचा पक्ष प्रवेश सोहळा सुरू असल्याचे दिसून आले.
आघाडीचा निर्णय अनिर्णीतच
या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसची आघाडी होणार अशी अपेक्षा असली तरी अद्यापही हा निर्णय अनिर्णीतच आहे. काँग्रसमध्ये तिकीटासाठी झोंबाझोंबी सुरू असल्याने आघाडी होईल किंवा नाही, आणि झालीच तर वाट्याला नेमक्या किती जागा येतील, याबद्दल नेत्यांनाच शंका आहे.शुक्रवारी २० उमेदवारांची यादी तयार करून ती काँग्रेसकडे आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत तिकीटासाठी तळ ठोकून बसलेले काँग्रसचे नगरसेवक आणि नेत शनिवारी सायंकाळच्या विमानाने चंद्रपूरला निघाले असले तर, अद्याप आघाडीबद्दल कुणीही मोकळेपणाणने बोलायला तयार नसल्याने राष्ट्रवादी आता दुसऱ्या यादीची तयारी सुरू केली आहे.या संदर्भात राकाँचे शहराध्यक्ष शशीकांत देशकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आघाडीसंदर्भात आपण स्वत: काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया, शहराध्यक्ष नंदू नागरकर, रामू तिवारी यांचञयाशी चर्चा केली. काँग्रसने आधी ४ ते ५ जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र आम्ही १७ जागा मागितल्या. त्यामुळेच २० नावांची यादी पाठविली. त्यावर काय निर्णय होतो, हे अद्याप कळलेले नाही. असे असले तरी ३७ उमेदवारांची यादी आपल्याकडे तयार असून रविवारी दुसरी यादी जाहीर केली जाईल, असे देशकर म्हणाले.
भाजपाचे ३८ उमेदवार घोषित
भाजपाच्या ३८ उमेदवारांची यादी आज शनिवारी जाहीर करण्यात आली. यात दे.गो. तुकूम प्रभाग - ओबीसी - अनिल पांडुरंग फुलझेले, खुला- सुभाष दिनकरराव कासनगोट्टूवार. शास्त्रीनगर प्रभाग - एस.सी. महिला - शितल रविंद्र गुरनुले, खुला महिला - वनिता विठ्ठल डुकरे. एम.ई.एल. प्रभाग - एस.सी. महिला - वंदना सुरेश जांभुळकर, एस.टी. अंकुश नामदेव सावसाकडे. बंगाली कॅम्प - एस.सी. महिला - जयश्री महेंद्र जुमडे. विवेकनगर प्रभाग - ओबीसी - संदीप किसन आवारी, खुला महिला अंजली शंकरराव घोटेकर. इंडस्ट्रीयल प्रभाग - एस.सी. महिला - शारदा श्रीनिवास मेकला. जटपूरा प्रभाग - एस.सी. अॅड. राहुल अरुण घोटेकर, ओबीसी महिला - छबुताई मनोज वैरागडे. वडगाव प्रभाग - ओबीसी महिला - इंदू भाऊराव जेऊरकर, खुला महिला - राखी संजय कंचर्लावार, खुला - रवींद्र तातोबाजी झाडे. नगिनाबाग प्रभाग - एस.सी. महिला - सविता राहुल कांबळे, ओबीसी - राहुल बाळकृष्ण पावडे, खुला महिला - वंदना अरुण तिखे, खुला - प्रशांत एकनाथराव चौधरी. एकोरी मंदीर प्रभाग - एस.सी. - राजू गणपत येले, खुला - संतोष रामकृष्ण वडपल्लीवार. भानापेठ प्रभाग - खुला (महिला) - आशा विश्वेश्वर आबोजवार, खुला - संजय नारायणराव कंचर्लावार. महाकाली प्रभाग - ओबीसी (महिला) - अनुराधा दत्तात्रय हजारे, खुला (महिला) - वनिता अनिल कानडे. बाबूपेठ प्रभाग - ओबीसी - श्रीकृष्ण जनार्धन आगलावे, खुला (महिला) छाया सुंदर खारकर, खुला - महादेव किष्टया आरेवार. पठाणपुरा प्रभाग - एस.सी. - सतीश आत्माराम घोनमोडे, ओबीसी (महिला) - सुष्मा शरद नागोसे, खुला (महिला) - खुशबु अंकुश चौधरी, खुला - वसंता राजेश्वरराव देशमुख. विठ्ठल मंदीर प्रभाग - धनंजय गजाननराव हुड, संगीता राजेंद्र खांडेकर, ओबीसी - श्रीहरी शंकरराव बनकर, खुला (महिला) - शिल्पा लक्ष्मीकांत देशकर. हि. लालपेठ कॉलरी प्रभाग - एस.टी. ज्योती गणेश गेडाम. डॉ.आंबेडकर नगर प्रभाग - जितेंद्र आनंदराव धोटे यांचा समावेश आहे.
नागरकर की तिवारी ?
४महानगर पालिकेच्या निवडणुकीत या वेळी झालेल्या नव्या प्रभाग रचनेमुळे काँग्रेसमध्ये तिकीटा देताना नंदू नागरकर की रामू तिवारी असा नवा पेच निर्माण झाला आहे.१२ वादग्रस्त नगरसेवकांच्या यादीत रामू तिवारी यांचे नाव पहिल्या क्रमावर आहे. त्यांना तिकीट देऊ नये असे पुगलिया गटाचे म्हणणे आहे. मात्र त्यांना तिकीट देण्यावर आमदार वडेट्टीवार यांचा गट ठाम आहे. मुंबईतील घडामोडी लक्षात घेता या १२ नगरसेवकांच्या गटाला तिकीटा मिळणार असल्याचे संकेत आहेत. नागरकर हे विद्यमान शहराध्यक्ष आहेत. तर, रामू तिवारी हे स्थायी समितीचे माजी सभापती आणि आमदार वडेट्टीवारांचे निकटस्थ आहे. नव्या प्रभाग रचनेत या दोघांचाही प्रभाग एकच आला आहे. त्यामुळे या दोघांनाही तिकीटा मिळाल्या तर एकाच पक्षात राहून एकमेकांविरूद्ध लढणे शक्यच नाही. त्यामुळे कोणातरी एकाला नवा प्रभाग शोधावा लागणार आहे. त्यामुळे दोघेही हक्क सांगत असलेल्या महाकाली मंदिर प्रभागातून नागरकर की तिवारी, असा प्रश्न मोठ्या चवीने चर्चीला जात आहे.