मनपा कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर
By Admin | Published: December 6, 2015 12:51 AM2015-12-06T00:51:22+5:302015-12-06T00:51:22+5:30
महानगरपालिकेत कार्यरत कर्मचारी मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी एक-दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
प्रशासनाविरोधात रोष : विविध मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष
चंद्रपूर : महानगरपालिकेत कार्यरत कर्मचारी मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी एक-दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचाऱ्यात असंतोष व्यक्त होत आहे. १३ डिसेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास १४ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
मनपा कर्मचाऱ्यांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, मंजूर आकृतिबंधातील पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना समावेशन, पदस्थापना करावी, वरिष्ठ पदांचा कार्यभार काढण्यात यावा, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची मर्यादा वाढवावी, १५ टक्के नक्षल प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, सफाई विभागातील वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना जवळच्या झोनमध्ये नियुक्त करावे, वर्ग चारच्या सफाई कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर पदोन्नती द्यावी, वाहनचालक म्हणून काम करीत असलेल्या वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना वाहनचालक पदावर पदोन्नती द्यावी, फायरमन म्हणून काम करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना फायरमनपदावर नियुक्ती द्यावी, यासह अन्य मागण्या मनपा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून या मागण्या करण्यात आल्या असल्या तरी महानगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, हे विशेष.
भारतीय नगर परिषद कामगार संघाच्या पुढाकारातून होणाऱ्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, अशी विनंती भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. शैलेश मुंजे, सुरेश आंबेकर, तुकड्यादास डुमरे, सारंग निर्मळे, सचिन माकोडे, वासंती बहादुरे, बेनेहर जोसेफ, विवेक पोतनूरवार, भूपेश गाठे, प्रदीप मडावी, संतोष गर्गेलवार, मनोज सोनकुसरे, महेंद्र हजारे, उदय मैलारपवार, अनिरुद्ध राजूरकर, मधुकर चिवंडे, मधू श्रीरामे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)