स्मशानभूमी नाही गावाला, गाव नुसते नावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:04+5:302021-07-27T04:29:04+5:30
प्रकाश पाटील मासळ बु. : देश लवकरच स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना चिमूर तालुक्यातील नंदारा गावात अजूनही ...
प्रकाश पाटील
मासळ बु. : देश लवकरच स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना चिमूर तालुक्यातील नंदारा गावात अजूनही हक्काच्या अंत्यसंस्कारांसाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने मिळेल त्या जागेवर किंवा गावालगतच्या नाल्यावर अंत्यसंस्कार करावा लागत आहे. मृतदेहांची अवहेलनाच होत आहे. मासळ परिसरातील नंदारा गावसुद्धा अग्रशिल आहे. त्यामुळे स्मशानभूमी नाही गावाला, गाव नुसते नावाला, असे म्हणण्याची वेळ नंदारा गावावर आली आहे.
मासळ परिसरातील नंदारा गावात गट ग्रामपंचात असून, या गावची लोकसंख्या हजार ते दीड हजार असून, या गावात वर्ग १ ते ४ पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. एकेकाळी याच गावात बैलाचा शंकरपट व्हायचा. तसेच सावकाराच्या नंदारा म्हणून नावाने या गावाची ओळख या परिसरात आहे. राजकीयदृष्ट्या गाव दुर्लक्षित असूनसुद्धा याच गावातील जिल्हा परिषद सदस्य ॲड. नवयुवक कामडी हे २० वर्षांपूर्वी निवडणुकीत विजयी झाले. परंतु सदर गावामध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटूनसुद्धा उघड्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
आजतागायत गावकऱ्यांना फक्त आश्वासनेच मिळाली. हक्काची स्मशानभूमी मिळालीच नाही. नंदारा गावालगत स्मशानभूमीसाठी सरकारी जागा उपलब्ध नसून, अंत्यविधीसाठी खासगी जागेचा वापर करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्मशानभूमीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
बॉक्स
स्मशानभूमी नसल्याने कुठेही अंत्यसंस्कार
स्मशानभूमी नसल्याने गावालगत खासगी जागेत, रस्त्यालगत उघड्यावर खाली जागेत किंवा उन्हाळ्यात गावालगत नाल्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. नंदारा गावामध्ये एखाद्या व्यक्तिचा मृत्यू झाला तर गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी अनेक मृतदेहांची हेळसांड होत आहे.
260721\img-20210724-wa0130.jpg
नंदारा ग्रामपंचायत समोरील हीच स्मशानभूमीसाठी प्रस्तावित खाली जागा