सर्पदंशानंतर तत्काळ उपचार नाही.. वडिलाचा मृत्यू, मुलगी गंभीर; चंद्रपूर रुग्णालयात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 02:48 PM2022-09-29T14:48:01+5:302022-09-29T14:48:12+5:30
मृतदेह उचलण्यास कुुटुंबीयांचा नकार
गाडेगाव (चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील विरुर गाडेगाव येथील पवन देवराव मेश्राम (२७) यांना बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विषारी मण्यार सापाने दंश केला. कुटुंबीयांनी तत्काळ पवनला गडचांदूर रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करीत पवनला चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुढील उपचारासाठी रेफर केले. मात्र तिथे तत्काळ उपचार झाला नाही. पहाटे ५ वाजतापासून पवनने सकाळी ७ वाजेपर्यंत मृत्यूशी झुंज दिली. वेळीच उपचार न मिळाल्याने पवनचा मृत्यू झाला. याला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप करीत दोषींवर कारवाईसाठी कुटुंबीयांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
ज्यावेळी पवनला चंद्रपूरच्या रुग्णालयात आणण्यात आले, त्यावेळी त्याला तत्काळ उपचार करण्याची गरज होती. मात्र तसे काही झाले नाही. काही वेळानंतर पवनची पाच वर्षीय अनुश्री नामक मुलगी हीदेखील उलट्या करू लागल्याने तिलासुद्धा सर्पदंश झाला असल्याचे निदर्शनास आले.
ही बाब चंद्रपूर भाजप अनुसूचित जमाती अध्यक्ष धनराज कोवे यांना माहीत होताच त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे कोवे व कुटुंबीयांनी दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, अन्यथा आम्ही रुग्णालयातून मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेतली.
माजी मंत्री हंसराज अहिर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले
या घटनेची माहिती माजी मंत्री हंसराज अहिर यांना कळताच त्यांनी नियोजित कार्यक्रम टाळून रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालय व्यवस्थापनाला त्यांनी चांगलेच धारेवर धरले. ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लगेच मुलगी अनुश्रीवर उपचार सुरू झाला. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता व सिव्हिल सर्जन यांना पुन्हा असे प्रकार घडू नये, अशी ताकीद अहिर यांनी दिली.
रुग्ण ज्यावेळी रुग्णालयात दाखल झाला, त्यावेळी त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. आमच्या डॉक्टरांनी वेळीच औषधोपचार सुरू करून त्याला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र विष सर्वत्र पसरले असल्याने त्याचा मृत्यू झाला.
- डॉ. निवृत्ती जीवने, निवासी वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर.