ना मास्क, ना डिस्टन्स विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:52 AM2021-02-06T04:52:06+5:302021-02-06T04:52:06+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेल्या शाळा हळुहळू सुरू होत आहे. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले ...
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेल्या शाळा हळुहळू सुरू होत आहे. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. आठ ते दहा महिन्यापासून घरी मौजमजा, धमाल करणारे विद्यार्थी आता शाळेत बंदिस्त झाले आहे. त्यातही कोरोनाची दहशत कायम आहे. त्यामुळे या सर्वांना सांभाळताना शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडत असून डिस्टन्स तसेच मास्क लावण्यासंदर्भात शिक्षकांना वारंवार सांगावे लागत आहे.
मार्च २०२० पासून बंद झालेल्या शाळा प्रथम २३ नोव्हेंबरपासून आठवी ते दहावीचे वर्ग भरवून सुरु करण्यात आल्या तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. गणित, विज्ञान, इंग्रजी विषयांचे अध्ययन सुरू आहे शिक्षक्केतर कामे सांभाळून शिक्षकांना शिकवावे लागत आहे. दोन विद्यार्थ्यांमधील अंतर ठरवून दिले असले तरी विद्यार्थी मात्र घोळक्याने शाळेत रहात असल्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांना सतत विद्यार्थ्यांना टोकावे लागत आहे. त्यातही मास्क लावण्यासाठी विद्यार्थी कंटाळा करीत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शिक्षकांना लक्ष द्यावे लागत आहे.
मास्कचा वापर करण्यासाठी सतत सांगावे लागत आहे. सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन तपासणी आदी कामेही शिक्षकांना करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देतानाच या सर्व गोष्टी तपासल्या जात आहे. ना गप्पा, ना एकत्र जेवण हे सारे आता बंद झाले आहे. पुन्हा ते दिवस कधी येतील, याची विद्यार्थी वाट बघत आहे. या सर्वांमध्ये मात्र शिक्षकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एकूण शाळा
१,५५८
एकूण विद्यार्थी
१,२८९४०
शिक्षक उपस्थिती
३७६०
कोट
कोरोनासंकटानंतर सुरू झालेल्या शाळांमध्ये आता हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत आहे. शिक्षकांच्या कामात मात्र वाढ झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचे रोजचे तापमान व ऑक्सिजन घेणे, त्याच्या नोंदी ठेवणे रोजची उपस्थिती वरिष्ठांकडे पाठवणे ही कामे करावी लागत आहेत. यात बराच वेळ जात आहे तसेच विद्यार्थी मास्क लावून आले पाहिजे, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझर या बंधनांचे पालन करण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागत आहे. जास्त पटसंख्येच्या शाळांमध्ये एकाच वर्गात सामाजिक अंतर ठेवून बसवायला जागा अपुरी पडत आहे.
- हरीश ससनकर
विषय शिक्षक, पोंभुर्णा
---
कोट
शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नसल्यामुळे स्वच्छतेपासून सर्व कामे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना करावी लागत आहे. त्यातच कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासणी करून शाळेमध्ये नोंदणी ठेवाव्या लागत आहे. यात जास्त वेळ जात असून शिकविण्यासाठी प्रत्येक शिक्षकांना कमी वेळ मिळत आहे.
- प्रकाश चुनारकर
जि.प. शाळा, वेंढली.